मसाप ब्लॉग  

मुलांना वाचनाची गोडी लावण्यासाठी पुढाकार घ्या

June 15, 2018

'मसाप' चे शाळा आणि पालकांना आवाहन 

पुणे : मुलांमध्ये साहित्याची आवड आणि वाचनाची गोडी निर्माण करण्यासाठी येत्या शैक्षणिक वर्षांपासून शाळांनी आणि पालकांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन महाराष्ट्र साहित्य परिषदेने शाळांना आणि पालकांना केले आहे. 
परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, 'मुलांच्या गतिमान जीवनशैलीत खेळाला आणि अवांतर वाचनाला अजिबात स्थान नाही. या मुलांमध्ये वाचनाविषयीची आणि साहित्याची गोडी निर्माण करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे गरजेचे आहे. यासाठी शाळांनी आणि पालकांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. साहित्य परिषदेतर्फे सर्वतोपरी मदत यासाठी केली जाईल. 
शाळांनी काय करणे अपेक्षित आहे
१. शाळा सुरु होण्यापूर्वीची राष्ट्रगीतानंतरची दहा मिनिटे या उपक्रमासाठी द्या. 
२. या दहा मिनिटात दररोज शिक्षकांनी मुलांना एक कविता, एक कथा, पुस्तकातील काही भाग किंवा मान्यवर लेखकाचे जीवनचरित्र वाचून दाखवावे. 
३. शाळेतील एखादे शिक्षक रजेवर असतील तर त्यांच्या तासाला जाणाऱ्या शिक्षकांनी वर्गात पुस्तकांची पेटी घेऊन जावी. प्रत्येक मुलाला त्याच्या आवडीचे पुस्तक वाचनासाठी द्यावे. 
४. मुलांनी काय वाचले हे लिहिण्यासाठी त्यांना स्वतंत्र वही करायला सांगून त्यात त्या पुस्तकाविषयी लिहायला सांगावे. उत्तम नोंदी ठेवणाऱ्या मुलांना प्रोत्साहन द्यावे. 
५. दर तीन / सहा महिन्यांनी या बालवाचकांचे वाचक संमेलन घ्यावे. 
६. दरवर्षी शाळेत स्नेसंमेलनाला जोडून विद्यार्थ्यांसाठी साहित्य संमेलन घ्यावे. 
७. मुलांना शाळेतर्फे जी पारितोषिके दिली जातात ती ग्रंथरूपात द्यावीत. 
पालकांचा असा सहभाग अपेक्षित आहे
१. सोसायटीत मुलांसाठी वाचक पेट्या असाव्यात असा आग्रह सोसायट्यांकडे धरावा. 
२. वर्षात मुलांच्या आवडीची २० पुस्तके खरेदी करावीत. 
३. आठवड्यातून किमान एक तास पालकांनी मुलांबरोबर सहवाचन करावे. 
४. समवयस्क मित्राच्या वाढदिवसाला ग्रंथ भेटच देण्याचा आग्रह धरावा. 
५. सोसायटीतल्या मुलांची वाचकभिशी करून त्यात त्यांना वाचलेल्या पुस्तकांविषयी बोलायला सांगा. 
६. जास्तीत जास्त पुस्तके वाचणाऱ्या मुलांना वैयक्तिक आणि सोसायटीतर्फे पारितोषिक द्यावीत. 
साहित्य परिषद अशी मदत करेल 
१. मुलांनी कोणती पुस्तके वाचावीत याची यादी उपलब्ध करून दिली जाईल.
२. शाळांमध्ये 'लेखक तुमच्या भेटीला' हा उपक्रम राबविण्यासाठी मदत करेल. 
३. बाल वाचक संमेलन आणि स्नेहसंमेलनांना जोडून मुलांसाठी साहित्य संमेलन घेण्यासाठी सर्वप्रकारचे सहकार्य करेल. 
४. आर्थिकदृष्ट्या कमकुवत मुलांसाठी बालवाचक पालकत्व योजना राबविण्यासाठी मदत करेल. 
५. प्रत्येक शाळेतील शाळेने नोंद ठेऊन शिफारस केलेल्या विद्यार्थी वाचकांना 'उत्तम वाचक' म्हणून प्रमाणपत्र देईल. मुलांनी अधिकाधिक पुस्तके वाचावीत यासाठी प्रयत्न करणाऱ्या शाळांचा आणि सोसायट्यांचा विशेष सन्मान करण्यात येईल. अशा शाळांना ग्रंथाच्या रूपाने मदत करण्यात येईल.  

Please reload

Featured Posts

साहित्य परिषदेतील दुर्मीळ ग्रंथांच्या डिजिटायजेशनचे काम सुरु

January 18, 2018

1/4
Please reload

Recent Posts
Please reload

Archive
Please reload

Search By Tags