अण्णाभाऊंनी मराठी साहित्य भूमीत समाजपरिवर्तनाचा विचार पेरला : प्रा. मिलिंद जोशी
साहित्य परिषदेत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन
पुणे : 'अण्णाभाऊ साठे यांचे संबंध साहित्यच हे विद्रोही तत्वज्ञानावर उभे आहे. हे विद्रोही तत्वज्ञान त्यांना मावर्स, गॉर्की, फुले, शाहू आणि आंबेडकर यांच्या कडून मिळाले. या विद्रोही तत्वज्ञानातून प्रेरणा घेऊन अण्णाभाऊंनी मराठी साहित्याच्या भूमीत समाजपरिवर्तनाचा विचार पेरला असे मत महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र साहित्य परिषद आणि दलित साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार, धर्मराज निमसरकर (अध्यक्ष, दलित साहित्य परिषद), दीपक करंदीकर उपस्थित होते. महाराष्ट्र कल्चरल सेंटरचे कलावंत हर्षद राजपाठक व सचिन जोशी यांनी अण्णाभाऊंच्या 'सापळा' आणि 'रक्ताचा टिळा' या कथा आणि 'माझा रशियाचा जीवनप्रवास' या ग्रंथातील 'लाल ताऱ्याखाली' आणि 'कलेचं माहेरघर' या लेखांचे वाचन केले.

प्रा. जोशी म्हणाले, 'मराठी साहित्याच्या विकास प्रक्रियेमध्ये लेखक, संवेदनशील कार्यकर्ता आणि कवी म्हणून अण्णाभाऊ साठे यांचे मोलाचे योगदान आहे. शोषित, पीडित, दलित आणि उपेक्षित वर्गाच्या वेदना त्यांनी समर्थपणे आपल्या साहित्यातून मांडल्या. त्यांच्या साहित्याने मराठी साहित्याला नव्या जीवन जाणिवा दिल्या. त्यांचे शाहिरी वाङ्मय मराठी शाहिरी कवितेला नवे परिमाण देणारे ठरले. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचे प्रतिबिंब अण्णाभाऊंच्या साहित्यात आहे याचे कारण स्वतः अण्णाभाऊ या लढ्यात सहभागी होते. अणाभाऊ साठे हे 'लोकनाट्य' या शब्दाचे जनक मानले जातात. पारंपरिक तमाशात प्रारंभी गणात गणपतीला आणि विविध प्रकारच्या देवदेवतांना वंदन करून तमाशाला सुरुवात होत असे. यात बदल करून अण्णाभाऊंनी महापुरुषांना वंदन करण्याची नवी पद्धत अस्तित्वात आणली. परंपरागत तमाशातील रंजकता कमी करून समाजपरिवर्तनासाठी आवश्यक असणाऱ्या बंडखोर जाणिवा त्यांनी लोकनाट्यातून व्यक्त केल्या. आपल्या साहित्यातून अण्णाभाऊंनी विद्रोही जीवन मूल्यांची पेरणी केली. सामाजिक परिवर्तनाचा ध्यास हा अण्णाभाऊंच्या साहित्यविश्वाचा श्वास आहे'.
धर्मराज निमसरकर म्हणाले, 'केवळ एकोणपन्नास वर्षाचे आयुष्य लाभलेल्या अण्णाभाऊंनी विपुल साहित्य निर्मिती केली. उपेक्षितांचे अंतरंग त्यांनी साहित्यातून मांडले. त्यांचे अनुभव सच्चे होते. चाकोरीबाहेरचे जग त्यांनी मराठी साहित्यात आणले.'
दीपक करंदीकर यांनी सूत्रसंचालन केले.