रसिक प्रेक्षकांवर बरसले कवितांचे घन
मसापत रंगला 'एक कवियित्री एक कवी कार्यक्रम
पुणे : ढगांशी लपाछपी खेळणारा पाऊस... विविधरंगी सुरेख सायंकाळ... पाऊस आणि कवितेचं मनाला भावणारे समीकरण... वारीचा अनुपम सोहळा आणि जगण्यातली गंमत सांगणारी सभागृहात होणारी शब्दबरसात, अशा सुंदर वातावरणात रसिकांवर कवितांचे घन बरसले. स्पृहा जोशी यांनी 'माझ्या मनाची पालखी, कुण्या वारीला निघाली', 'एका वेळी कसे मिळावे मनास वेड्या सारे काही', सूर बहुतेक असतात मध्यमवर्गीयांसारखे', 'या साऱ्यातून मी गेल्यावर माझ्यानंतर' अशा कवितांतून आयुष्याचे मर्म उलगडले. वैभव जोशी यांनी 'फेअर इनफ', 'तुला वाचून जाताना, 'डोह', 'वगैरे वगैरे', 'येत्या सुगीत काही अश्रू विकून पाहू', अशा वैभव जोशी आणि स्पृहा जोशी यांनी सादर केलेल्या हृदयस्पर्शी कवितांनी रसिकांना 'काव्य' सफर घडवली. महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे 'एक कवयित्री एक कवी' या उपक्रमांतर्गत स्पृहा जोशी व वैभव जोशी यांच्याशी कवितेच्या गप्पा रंगल्या. संवादात गुंफलेल्या कवितांमधून ही मैफल उत्तरोत्तर रंगत गेली आणि 'वाह', 'इर्शाद' अशी रसिकांकडून दादही उमटत गेली. प्रमोद आडकर आणि कवी उद्धव कानडे यांनी त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार उपस्थित होत्या.
स्पृहा जोशी म्हणाल्या, 'माझ्यातला कवितांचा बहर ओसंडून वाहत होता तेव्हा मी लिहिणे थांबवून वाचन केले पाहिजे, असा मोलाचा सल्ला जवळच्यांनी दिला आणि तो खूप उपयोगी पडला. अभिनयाचे क्षेत्र खूप फसवे आहे. अशा वेळी स्वतःला ताळ्यावर ठेवण्याचे, आयुष्याचा समतोल राखण्याचे बळ कविता देते. आयुष्याच्या विविध टप्प्यावर विविध कवींचा प्रभाव पडत गेला. 'चलता है' असा अटीट्युड बाळगल्याने आजकालची गाणी लक्षात राहत नाहीत. काव्यशास्त्राचे मापदंड, नियम पाळले, त्याचा अभ्यास केला तर कविता अधिक सुंदर होते.'
वैभव जोशी म्हणाले. 'मनाच्या भग्न कोपऱ्यात कविता अनेक वर्ष पडून असते आणि अचानकपणे मूर्त, देखण्या स्वरूपात समोर उभी राहते तेव्हा आनंदामिश्रीत भावनांचे तरंग उठतात. चराचरात एक महाकाव्य लिहिले जात असते. त्याचा क्रम जुळला की कविता कळू लागते. कवी वेगवेगळ्या पर्यायांमध्ये स्वतःला आजमावून पाहत असतो. त्याला नाविन्याचे, प्रवाही राहण्याचे व्यसन जडलेले असते प्रत्येक स्वरूपाला, प्रवाहाला, अगदी जगण्यालाही लय असते. बारकाईने निरीक्षण केल्यास जगण्यातही कविता दडलेली असते, हे लक्षात येते. मात्र, सध्या प्रत्येकालाच अभिव्यक्त होण्याची घाई झालेली आहे. त्यामुळेच सुळसुळाट झाला आहे.'