योगिता मगर व ऐश्वर्या म्हस्के या विद्यार्थिनींना मसापचा अक्षरयात्री पुरस्कार जाहीर


पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे यावर्षीपासून माध्यमिक शालान्त परीक्षेत मराठी विषयात प्रथम येणाऱ्या दोन विद्यार्थांना अक्षरयात्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. योगिता मगर (जिजामाता विद्यालय, सराटी, ता. इंदापूर, जिल्हा पुणे) व ऐश्वर्या म्हस्के ( माउंट कार्नेल कॉन्व्हेंट हायस्कुल, लुल्लानर, पुणे) हे या वर्षीच्या पुरस्कारांचे मानकरी आहेत. रोख रक्कम व स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. हे पुरस्कार अक्षरयात्री या संस्थेने महाराष्ट्र साहित्य परिषदेकडे दिलेल्या देणगीतून प्रतिवर्षी देण्यात येणार आहेत. ज्येष्ठ साहित्यिक आणि अखिल भारतीय बालकुमार साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. न. म. जोशी यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. या कार्यक्रमाला महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार, अक्षरयात्री या संस्थेच्या अध्यक्ष संजीवनी बोकील, कार्यवाह डॉ. अ. ल. देशमुख, कोषाध्यक्ष सुप्रिया केळवकर उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम शनिवार २८ जुलै २०१८ रोजी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात होणार आहे, अशी माहिती मसापचे कार्यवाह माधव राजगुरू यांनी दिली.