ना. सी. फडकेंच्या साहित्याचा करिष्मा चिरंतन : शि. द. फडणीस
'मसाप' तर्फे ना. सी. फडके यांना १२५ व्या जयंतीनिमीत्त अभिवादन

पुणे : आप्पासाहेब म्हणजेच आमचे ना. सी. फडके यांनी आपल्या साहित्यातून एक करिष्मा निर्माण केला, हा करिष्मा अजूनही चिरंतन आहे, असे मत ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि. द. फडणीस यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने साहित्यिक ना. सी. फडके यांच्या सव्वाशेव्या जयंती वर्षाच्या निमित्ताने आयोजित 'स्मरण आप्पांचे' या कार्यक्रमात सुनिधी पब्लिकेशनने काढलेल्या आणि ना. सी. फडके यांच्या कन्या गीतांजली जोशी यांनी संपादित केलेल्या 'केशराचा मळा' या पुस्तकाचे प्रकाशन शि. द. फडणीस यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार, गीतांजली जोशी, अविनाश काळे उपस्थित होते. ना. सी. फडके यांचा जीवन व साहित्य प्रवास उलगडून दाखविणारा 'साहित्य गंगेच्या काठी' हा विशेष कार्यक्रम संजय गोखले, दीपाली दातार, गीतांजली जोशी, यांनी सादर केला. उत्तम वक्ता म्हणून ख्यातकिर्त असलेल्या ना. सी. फडके यांच्या आवाजातील ध्वनिफित यावेळी श्रोत्यांना ऐकवण्यात आली. चाळीस वर्षानंतर आप्पांचा आवाज ऐकताना साहित्यरसिक भारावले.

शि. द. फडणीस म्हणाले, 'केशराचा मळा हे पुस्तकाचं शीर्षक अत्यंत योग्य आहे. आपासाहेबांच्या साहित्यात सुगंधही आहे आणि रंग ही आहे. तेच तर त्यांच्या साहित्याचं वैशिष्ट्य आहे. सौन्दर्य म्हणजे काय, शुद्ध साहित्य म्हणजे काय, हे अगदी सोप्या भाषेत अप्पासाहेबांनी आपल्या साहित्यातून मांडलं. आपल्या लेखणीतून कलेसाठी कला ही भूमिकाही त्यांनी पुढे नेली. त्यांच्या या भूमिकेमुळं झालेला अत्रे-फडके वादही गाजला. वाद होतात, वाद मिटतातही, याचा प्रत्यय मला आला. अत्रे आणि फडके यांचा समेटाच्या सोहळ्याला मी उपस्थित होतो. दोघांनी एकमेकांच्या गळ्यात हार घालून हा वाद मिटवला. त्यावर मी सोबत मध्ये व्यंगचित्र काढलं होतं, अशी आठवण यावेळी शि. द. फडणीस यांनी सांगितली.
प्रा. जोशी म्हणाले, 'एकिकडे हरिभाऊ आपटे आणि दुसरीकडे बा. सी. मर्ढेकर यांच्यामधील मोक्याच्या टप्प्यावर ना. सी. फडके यांची वाड्मयीन कारकीर्द होती. त्यांनी मराठी साहित्याला नवी दिशा देण्याचा प्रयत्न केला. त्यांची तंत्रशुद्धता, आधुनिकता, अद्ययावतपणा, बांधेसूदपणा, विलोभनीय भाषा शैली यामुळे त्यांच्या नावाने मराठी साहित्यातला एक कालखंड ओळखला गेला. हेच त्यांचे मराठी साहित्याला योगदान आहे. उदबोधन आणि मनोरंजन ही दोन सूत्रे फडके पूर्व साहित्यामागे होती तिला केवळ मनोरंजनाच्या वाटेने नेण्याचे व तिच्यावरील सर्व प्रकारची बंधने झुगारून देण्याचे ऐतिहासिक कार्य फडके यांनी केले. 'कलेसाठी कला की जीवनासाठी कला' या वादात त्यांनी कलेची एक बाजू सतत लावून धरली त्यामुळे मराठी साहित्यविश्वातील वातावरण मुक्त व मोकळे राहण्यास मदत झाली.'उद्धव कानडे यांनी सूत्रसंचालन केले. प्रकाश पायगुडे यांनी आभार मानले.