प्रा. उषा तांबे यांना 'मसाप'चा डॉ. गं. ना. जोगळेकर स्मृती पुरस्कार जाहीर
पुणे : मुंबई मराठी साहित्य संघाच्या कार्याध्यक्ष प्रा. उषा तांबे यांना यावर्षीचा महाराष्ट्र साहित्य परिषदेचा डॉ. गं. ना. जोगळेकर स्मृती पुरस्कार जाहीर झाला आहे. रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. मंगळवार दि. १४ ऑगस्ट २०१८ रोजी सायंकाळी ६. ३० वाजता महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात होणाऱ्या कार्यक्रमात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रा. उषा तांबे यांना प्रदान करण्यात येणार आहे. डॉ. जोगळेकर यांच्या कन्या उज्ज्वला जोगळेकर, चिरंजीव पराग जोगळेकर, परिषदेचे प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार यावेळी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली.

प्रा. जोशी म्हणाले, 'प्रा. उषा तांबे यांनी तीस वर्षांहून अधिक काळ मुंबईच्या विविध महाविद्यालयात अध्यापनाचे काम केले आहे. उत्तम लेखिका असणाऱ्या प्रा. तांबे यांची काँक्रीटचे किमयागार, कहाणी कोयनेची, परिघाबाहेर, काबुल ब्युटिफूल, सेतू बांधियला सागरी, रोमांचकारी रेल्वे ही पुस्तके प्रकाशित झाली आहेत. मराठी बोलू कौतुके आणि दुसऱ्या पिढीचे आत्मकथन या पुस्तकांचे त्यांनी सहसंपादन केले आहे. ओपन हार्ट, प्रिझनर ऑफ तेहरान या पुस्तकांचे त्यांनी अनुवाद केले आहेत. संस्थात्मक कार्यात त्यांनी मोलाचे योगदान दिले असून मुंबई मराठी साहित्य संघाची धुरा त्यांनी यशस्वीपणे सांभाळली आहे. मुंबई मराठी साहित्य संघाच्या कार्याध्यक्ष असलेल्या प्रा. उषा तांबे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्ष होत्या. वाड्मय निर्मितीबरोबरच संस्थात्मक कार्यांसाठी दिलेल्या मोलाच्या योगदानाबद्दल त्यांना डॉ. गं. ना. जोगळेकर स्मृतीपुरस्काराने सन्मानित करताना महाराष्ट्र साहित्य परिषदेला आनंद होत आहे.