शासकीय परिभाषा कोश दुर्बोध
डॉ. माधव गाडगीळ यांची टीका

शासकीय परिभाषा कोश हे प्रत्येकाने वाचले पाहिजेत, म्हणजे कोणते शब्द वापरू नयेत याची माहिती मिळते. एकूणच शासकीय परिभाषा कोष दुर्बोध आहेत, अशी टीका ज्येष्ठ पर्यावरणतज्ञ आणि लेखक डॉ. माधव गाडगीळ यांनी मंगळवारी केली.
महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे आयोजित 'मसाप गप्पा' मध्ये लेखिका वर्ष गजेंद्रगडकर यांनी गाडगीळ यांच्याशी संवाद साधला. माझ्या लेखनावर इरावती कर्वे आणि दुर्गा भागवत यांच्या लेखनाचा प्रभाव असल्याचे गाडगीळ यांनी सांगितले. 'गेम थिअरी' या शब्दाला शासकीय परिभाषेत 'क्रीडा सि
द्धांत' असे म्हटले आहे. मात्र, त्यासाठी मी 'डावपेचाचे शास्त्र' हा शब्द वापरला आहे, असा दाखला गाडगीळ यांनी या वेळी दिला. शब्दांशी खेळ करण्याची आणि वेगवेगळे शब्द भाषेमध्ये उपयोगात आणण्याची सुविधा ही विकिपीडियावर उपलब्ध झाली आहे. मराठी डिक्शनरीमध्ये फारसे काम झालेले नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. निसर्गाच्या सान्निध्यात राहून ज्ञान संपादन करता आले तर छान होईल, या माझ्या इच्छेला वडिलांनी प्रोत्साहन दिले. मात्र केवळ निसर्ग निरीक्षण उपयोगाचे नाही तर त्याला गणिताची जोड दिली पाहिजे ही बाब ध्यानात आली. त्यानुसार मी शिक्षण पूर्ण केले, असे सांगून गाडगीळ म्हणाले, 'सुष्टिविज्ञान' मासिकामध्ये प्रारंभीचे लेखन केले. नंतर चार दशके पुण्याबाहेर वास्तव्य असल्याने इंग्रजीतून लेखन केले. पुण्यात वास्तव्यास आल्यापासून गेली बारा वर्षे मी मराठीमध्ये लेखन करीत आहे.' पर्यावरण आणि भौतिक विकास यात द्वंद्व नाही. पाश्चात्त्य राष्ट्रांमध्ये ते दिसतही नाही, याकडे लक्ष वेधून गाडगीळ म्हणाले, 'भरमसाट पैसे करण्याचा मोह आणि उद्योगांना फायदा हवा म्हणून विकासाचे चित्र दाखविले जाते. मात्र, या प्रक्रियेत पर्यावरणाकडे दुर्लक्ष होते. स्वीडन आणि जर्मनी येथील उद्योजक माफक नफ्यात काम करतात. आपल्याकडे लोकशाहीचा भंग करून आणि पर्यावरणाच्या ऱ्हासाकडे दुर्लक्ष करून विकास प्रकल्प राबविले जातात'