मसाप ब्लॉग  

बुलेट ट्रेन महत्वाची की सार्वजनिक आरोग्य?: डॉ. अभिजित वैद्य

August 11, 2018

डॉ. यशवंत तोरो यांना 'मसाप' चा पुरस्कार 

पुणे : बुलेट ट्रेनसाठी १.२५ लाख कोटी रुपये खर्च केले जातात. केंद्र सरकार आणि सर्व राज्यसरकारांची सार्वजनिक आरोग्यासाठीची मिळून तरतूद फक्त दोन लाख कोटी रुपये आहे. ज्यांच्यासाठी प्रगती आणि विकास करायचा त्यांच्या आरोग्यबाबतची सरकारची उदासीनता ही असंवेदनशीलताच आहे. बुलेट ट्रेन महत्वाची की सार्वजनिक आरोग्य? असा सवाल ज्येष्ठ हृदयविकार तज्ज्ञ आणि राष्ट्रीय आरोग्य सेनेचे अध्यक्ष डॉ. अभिजित वैद्य यांनी उपस्थित केला. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने डॉ.

 

शकुंतला क्षीरसागर पुरस्कृत कै. विलास शंकर रानडे पुरस्कार कॉन्टिनेन्टल प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या डॉ. यशवंत तोरो यांच्या 'कॅन्सर -निदान, उपचार व प्रतिबंध' या पुस्तकाला डॉ. अभिजित वैद्य यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार, परीक्षक मनोज देशपांडे उपस्थित होते.

डॉ. अभिजित वैद्य म्हणाले, 'व्याधींच्या विरुद्ध लढण्यासाठी उपचारांइतकीच प्रबोधनाची गरज आहे. आज अनेक व्याधीवरच्या उपचाराचा खर्च सर्वसामान्य लोकांच्या आवाक्या बाहेरचा आहे. मुळात खाजगी असलेले वैद्यकीय क्षेत्र जागतिकीकरणानंतर कार्पोरेट झाले आहे. कार्पोरेटक्षेत्राचे नफेखोरी हेच उद्धिष्ट असते पण सेवाभावी वृत्तीने रुग्णसेवा करणारे डॉक्टरही आहेत, ही देखील जमेची बाजू आहे.

डॉ. देशपांडे म्हणाले,'कर्करोग निदान,तपासण्या,प्रतिबंधात्मक उपाय,आधुनिक औषधोपचार,संशोधनात्मक काम,कर्करोगाच्या चिकित्सेची मदत करणाऱ्या धर्मादाय संस्था अशा यच्चयावत गोष्टींची शास्त्रशुद्ध माहिती मराठीत प्रकाशित करणारे हे पाहिलेच पुस्तक आहे'. प्राथमिक अवस्थेत निदान होणे ही कर्करोग बरा करण्यातील महत्वाची पायरी आहे.'जीवनशैलीतील चांगल्या बदलांमुळे 70-80%कर्करोग टाळले जाऊ शकतात. जास्त प्रमाणात दुग्ध जन्य पदार्थ,गोड पदार्थ ,फास्ट फूड, प्रदूषण,विविध व्यसने,मानसिक ताणतणाव ही कर्करोगाची प्रमुख कारणे आहेत. प्राथमिक अवस्थेत निदान होणे ही कर्करोग बरा करण्यातील महत्वाची पायरी आहे. 

डॉ. तोरो म्हणाले, 'सर्वजण कॅन्सर या रोगास इतर कोणत्याही दुर्धर व्याधीपेक्षा जास्त घाबरतो हे सत्य आहे. कर्करोगाचे निदान झाल्यानंतर रुग्णास या रोगावर कोणताही चांगला उपचार नाही, आपण आता जगणार नाही व आपण आता पूर्णतः निष्क्रीय आहोत अशी भावना मनात उत्पन्न होऊन कॅन्सर रुग्ण हतबल होताना मी अनेकदा पहिले आहे. कॅन्सर ग्रस्त रुग्णांच्या बोलण्यातून विशेषतः ग्रामीण भागातून आलेल्या रुग्णांची मानसिकता त्यांचे या रोगाबद्दलचे पूर्ण अज्ञान, उपचाराला येणारा अफाट खर्च, रोगावर करण्यात येणारे उपचार, त्यासाठी लागणाऱ्या चाचण्या या सर्वांची अडचण ज्यावेळी माझ्यासमोर आली त्याच वेळी या अशा रुग्णांसाठी व त्यांच्या नातेवाईकांसाठी साध्या व सोप्या भाषेत कॅन्सर विषयी काही माहिती उपलब्ध करून द्यावी असे सातत्याने वाटू लागले, त्यातूनच हे पुस्तक लिहिले.

यावेळी प्रा. मिलिंद जोशी यांनी मनोगत व्यक्त केले. प्रकाश पायगुडे यांनी प्रास्ताविक केले. सुनिताराजे पवार यांनी आभार मानले. वि. दा. पिंगळे यांनी सूत्रसंचालन केले.


 

Please reload

Featured Posts