चाकोरीबाहेरच्या लेखनाचा उचित सन्मान : विद्या बाळ
प्रा. उषा तांबे याना मसापचा कै. डॉ. गं. ना. जोगळेकर पुरस्कार

पुणे : धरणाची निर्मिती, रेल्वे, सागरी सेतू अशा स्थापत्य अभियांत्रिकी सारख्या चाकोरीबाहेरच्या विषयांवर लिहिणाऱ्या लेखिका अभावानंच आढळतात. याशिवाय कथालेखन, अनुवाद असं वैविध्यपूर्ण लेखन करणाऱ्या प्रा. उषा तांबे यान हा पुरस्कार मिळणं हा उचित सन्मान आहे. असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांनी व्यक्त केले. त्यांच्या हस्ते मुंबई मराठी साहित्य संघाच्या कार्याध्यक्ष प्रा. उषा तांबे यांना यावर्षीचा महाराष्ट्र साहित्य परिषदेचा डॉ. गं. ना. जोगळेकर स्मृती पुरस्कार देण्यात आला. रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी व्यासपीठावर मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार, डॉ. जोगळेकर यांच्या कन्या उज्ज्वला जोगळेकर, चिरंजीव पराग जोगळेकर उपस्थित होते.
विद्या बाळ म्हणाल्या, 'कर्तृत्ववान पतीला एखादा पुरस्कार मिळाला तर, साहजिकच पत्नीला आनंद होतो. ती त्या समारंभामध्ये उत्साहाने, अभिमानाने सहभागी होते. तसा आपल्या कर्तबगार पत्नीला मानाचा एखादा पुरस्कार मिळाला तर, तिचा पती तेवढ्याच उत्साहाने अभिमानाने समारंभात सामील होतो का? याविषयी आपण सर्वांनी विचार करायला हवा.'
प्रा. उषा तांबे म्हणाल्या, 'सध्या मराठी भाषेच्या भविष्याविषयी चिंतेचे वातावरण आहे. हिंदी - इंग्रजीचं आव्हान, भाषेचे व्याकरण, प्रमाणभाषा याविषयी गांभीर्याने विचार व्हायला हवा, कारण मराठीच्या वापराबद्दल मराठी माणूसच आग्रही नाही.'
प्रा. जोशी म्हणाले, 'साहित्य क्षेत्रात संस्थात्मक कार्य करणाऱ्या डॉ. जोगळेकरांसारख्या कर्तृत्वान व्यक्तींची संस्थांना गरज असते. टीकेला तोंड देऊन समर्थपणे आणि निरलसपणे कार्य करणाऱ्या व्यक्तीच कार्य पुढे नेत असतात. असे कार्यकर्ते सध्या दुर्मिळ झाले आहेत.'