चिरंतन वास्तवाला भिडणारी अलौकिक प्रतिभा शिवाजी सावंतांकडे होती
मसाप मध्ये डॉ. श्रीपाल सबनीस यांनी उलगडले 'मृत्युंजय'चे अंतरंग
पुणे : शिवाजी सावंत यांनी कर्णाच्या व्यक्तिरेखेला नायकत्व बहाल केले. कर्णाची बाजू ही एकट्या कर्णाची नव्हती ती कौरवांची बाजू होती. ती अधर्माची आणि असत्याची बाजू होती. अशा परिस्थितीत कर्णाला नायक म्हणून उभा करण्याचे मोठे आव्हान होते. सावंतांनी ते पेलले. चिरंतन वास्तवाला भिडणारी अलौकिक प्रतिभा शिवाजी सावंतांकडे होती. असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र साहित्य परिषद आणि शिवाजी सावंत मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शिवाजी सावंत यांच्या ७८ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात 'शिवाजी सावंतांची 'मृत्युंजय' कादंबरी आणि उपेक्षितांचे अंतरंग' या विषयावर ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार, सावंतांचे बालमित्र जयराम देसाई उपस्थित होते.

सबनीस म्हणाले, 'पेचाच्या भोवऱ्यात सापडलेल्या कर्णाची कर्णाची बाजू सावंतांनी समर्थपणे उभी केली. पाच हजार वर्षांपूर्वीच्या कर्णाच्या व्यक्तिरेखेत शिरून आपले आकलन सावंतांनी मांडले. विवेक शक्तीला आवाहन करण्यात अपयशी ठरलेल्या माणसांमुळे महाभारत घडले. आजही आसपास तेच सुरु आहे.'
प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, 'मृत्युंजय, छावा, आणि युगंधर सारख्या अजरामर साहित्यकृती निर्माण करून सावंतांनी मराठी साहित्याचे दालन समृद्ध केले. साहित्यातील नवतेच्या प्रभावाखाली वावरणाऱ्या समीक्षकांनी आपल्या सांस्कृतिक संचितांचे नवसर्जन करणाऱ्या सावंतांच्या लेखनाकडे दुर्लक्ष केले. त्यात सावंतांचे काहीच नुकसान झाले नाही. मात्र कोत्या समीक्षा वृत्तीचे दर्शन या निमित्ताने घडले. जिथे संघर्ष आहे, नाट्य आहे आणि उपेक्षा आहे अशा व्यक्तिरेखांविषयी सावंतांना आकर्षण वाटत होते. महापुरुषांच्या सामर्थ्याचा आणि मर्यादांचा वेध त्यांनी आपल्या साहित्यातून घेतला.'
जयराम देसाई यांनी आपल्या मनोगतातून शिवाजी सावंतांच्या आठवणींना उजाळा दिला. उद्धव कानडे यांनी सूत्रसंचालन केले. प्रकाश पायगुडे यांनी आभार मानले.