मसाप ब्लॉग  

बिथोवनची सिम्फनी अलीकडे ऐकायला मिळत नाही...

मसाप गप्पा मध्ये डॉ. जयंत नारळीकर आणि मंगला नारळीकर​

पुणे ; एरवी गणित काय आणि खगोलभौतिकशास्त्र काय, ही दोन्ही सामान्यांना समजून घेणे जिकिरीचेच. पण, ही अडचण निमिषार्धात दूर सारून हे अवघड विषय सोपे आणि रोचक करून सांगण्यात ज्यांची हातोटी आहे, असे नारळीकर दाम्पत्य समोर उपस्थित असेल तर मात्र बातच काही और. मग पाहतापाहता एकीकडे हे निरस विषय रंजक होत जातात, तर दुसरीकडे भारतीय विज्ञानजगतातील एक चालताबोलता इतिहास आपल्यापुढे उलगडत जातो. गमंत म्हणजे कधी याला किनार असते ती सहजीवनातील काही गोड आठवणींची तर कधी थेट देशोदेशीच्या संपन्न अनुभवांची... हे सारे काही श्रोत्यांना याची देही अनुभवता आले.


आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ खगोलभौतिकशास्त्रज्ञ आणि आपल्या कसदार लेखनाने मराठीतील विज्ञान-साहित्याचे दालन समृद्ध करणारे लेखक डॉ. जयंत नारळीकर आणि त्यांच्या पत्नी तसेच गणितज्ज्ञ मंगला नारळीकर या उभयतांना ऐकताना श्रोत्यांनी हा कायमसाठी जपून ठेवावा, असा अनुभव घेतला. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या 'मसाप गप्पा' या कार्यक्रमात नारळीकर दाम्पत्य सहभागी झाले होते. या वेळी त्यांच्याशी लेखिका चित्रलेखा पुरंदरे यांनी संवाद साधून त्यांना बोलते केले आणि मग पाहतापाहता विविध आठवणींचा अख्खा पट उलगडत गेला.'मसाप'चे माधवराव पटवर्धन सभागृहही या वेळी जणू चहू बाजूंनी फुलून आल्याचे चित्र होते. नारळीकर दाम्पत्याला ऐकायला आणि पाहायला आजही लोक किती आतुरलेले आहेत, याचा जिवंत दाखलाच या कार्यक्रमाने दिला. श्रोत्यांच्या गर्दीने 'मसाप'चे सभागृह तुडुंब भरले होतेच पण दुसऱ्या मजल्यावरची गॅलरीही खचाखच भरली होती. नारळीकरांनीही आपल्या चाहत्यांना निराश केले नाही. लग्न कसे ठरले, या प्रश्नापासून मुली काय करतात, कुठला लेखक आवडतो, विज्ञान आणि अध्यात्म यातील फरक काय, आजही या दोघांच्या गप्पांत गणित हा विषय का असतो... अशा अनेक प्रश्नांना या उभयतांनी मनमोकळी उत्तरे दिली.


आपली पकड वक्तृत्वावर अजूनही तेवढीच टिकून आहे, हे नारळीकर यांनी आपल्या अनेक हजरजबाबी आणि नर्मविनोदी उत्तरांनी दाखवून दिले. मुलाखतीदरम्यान कधी नारळीकर तर कधी मंगलाताईंनी अनेक खुसखुशीत आठवणी आणि विनोद सांगत श्रोत्यांना भरभरून आनंद दिला. आपल्याला मराठीतील विनोदी लेखन आवडते आणि 'पुलं', अत्रे आणि चि. वि.जोशी हे आपले आवडते लेखक असल्याचेही त्यांनी सांगितले. मुलाखत आणि आभारप्रदर्शन झाल्यावर एक विनोद सांगून एका खास अनौपचारिक शैलीत त्यांनी ही मुलाखत स्वतःच संपवली आणि जाताजाता 'बिथोवनची सिम्फनी अलीकडे ऐकायला मिळत नाही,' असे म्हणून अनेकांना अंतर्मुखही केले.


गंगेत कधीही अंघोळ केली नाही

'जयंत यांचे बालपण गंगेच्या काठावर असलेल्या बनारससारख्या पवित्र शहरात गेले. पण गंमत अशी की एरवी सगळ्यांना ज्या गंगेत स्नान करायचे प्रचंड आकर्षण असे, अशा गंगेत त्यांनी आजवर कधीही अंघोळ केलेली नाही. त्या वेळी महाराष्ट्रातून तिकडे बनारसला जाणाऱ्या अनेक नातेवाइकांना गंगेत स्नान करण्याची कोण हौस. पण जयंतने ते कधी केले नाही. घरात असलेल्या नळातून मात्र गंगेचेच पाणी यायचे, त्यात त्यांनी अंघोळ केली हे इथे सांगायला हवे,' असे मंगलाताई म्हणाल्या.


'अध्यात्मात मी अल्पमती'

विज्ञानाच्या क्षेत्रात मी थोडेसे काम केले. पण, आध्यात्माविषयी मला तेवढेही माहिती नाही. त्यामुळे विज्ञान श्रेष्ठ की आध्यात्म या विषयी माझ्या अल्पमतीवरून ठरवणे योग्य होणार नाही, असे डॉ. जयंत नारळीकर यांनी सांगितले. शिवाय, विज्ञान हे प्रत्येक गोष्टीचा आधार असते, आणि कार्यकारणभाव महत्त्वाचा मानतो, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.
Featured Posts
Recent Posts
Archive
Search By Tags
No tags yet.
Follow Us
 • Facebook Basic Square
 • Twitter Basic Square
 • YouTube Social Icon

© म.सा.प., पुणे 

Maharashtra Geet - Marathi
00:00 / 00:00
 • Facebook Social Icon
 • Twitter Social Icon
 • YouTube Social Icon

Total visitors: 

Website Designed & Developed By: 

एक लाख लेखक आणि एक कोटी वाचक

यांना जोडणारी अभिनव साहित्य चळवळ 

www.sahityasetu.org

सक्षम लेखक, सजग वाचक

 • Facebook Social Icon
 • Twitter Social Icon
 • YouTube Social Icon