top of page

मसाप ब्लॉग  

विंदांच्या बालकविता मूल समजून घेण्याचा नवा दृष्टीकोन देतात : राजीव तांबे

मसापचे काव्यवाचन, व्यख्यान, पुस्तक प्रकाशन आणि आठवणीतून विंदांना अभिवादन

पुणे : 'विंदांच्या बालकविता भन्नाटच आहेत कारण त्या दोन पातळीवर आहेत. जेव्हा त्या कविता मुले वाचतात तेव्हा त्या त्यांना त्यांच्या वाटतात. जेव्हा मोठी माणसं त्या बालकविता वाचतात तेव्हा त्या कविता त्यांना मुलांकडे पाहण्याचा, मूल समजून घेण्याचा नवा दृष्टीकोन देतात.' असे मत अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष राजीव तांबे यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र साहित्य परिषदेने विंदा करंदीकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या सांगतेनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. अमेय गुप्ते यांनी संपादित केलेल्या 'बहुआयामी विंदा' या पुस्तकाचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. राजन लाखे यांनी 'विंदांच्या कवितेचे वेगळेपण' या विषयावर आपले विचार मांडले. व्यासपीठावर महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, अमेय गुप्ते, ज्येष्ठ वात्रटिकाकार रामदास फुटाणे, उद्धव कानडे, वि. दा. पिंगळे उपस्थित होते.

'विंदांच्या' 'अजबखाना' या कवितासंग्रहातील कवितांचे वाचन राजीव तांबे यांनी केले त्याला रसिकांची दाद मिळाली.

राजन लाखे म्हणाले, 'विंदांची कविता अखेरपर्यंत मानवकेंद्री राहिली. ती काळाप्रमाणे बदलत गेली. काळातील अर्थांचे अनेक पदर उलगडणारी चिंतनगर्भ कविता विंदांनी लिहिली. त्यांच्या कवितेत राष्ट्रीय जाणिवांचा अविष्कार आहे. त्यांनी सर्व वळणाच्या कविता लिहून नवे रूपबंध निर्माण करून भाषेची समृद्धी वाढवली.'

प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, 'वर्षभर विंदांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने साहित्य परिषदेने पुण्यासह महाराष्ट्रभर शाखेच्या माध्यमातून विविध कार्यक्रम घेतले. कवितेला तत्वचिंतनच्या पातळीवर नेण्याचे असाधारण सामर्थ्य हा केशवसुत-मर्ढेकर आणि विंदा याना जोडणारा समान धागा आहे. दुसऱ्या महायुद्धानंतरच्या मराठी कवितेच्या आशय आणि अभिव्यक्तीच्या क्षेत्रमर्यादा विंदांनी आपल्या कठोर काव्यनिष्ठेने अधिक व्यापक आणि विस्तृत केल्या. विश्वसत्याचे दर्शन घेण्याच्या ध्यासातून निर्माण झालेल्या विंदांच्या सर्वस्पर्शी कवितेने मराठी मनांच्या जाणिवांचा प्रदेश समृद्ध केला. विंदा हे स्वतःच्या अटीवर जगणारे कवी होते. ताठ कणा असलेल्या विंदांच्या शब्दांना म्हणूनच मोल होते.' दीपक करंदीकर यांनी सूत्रसंचालन केले. प्रकाश पायगुडे यांनी आभार मानले.


Featured Posts
Recent Posts
Archive