top of page

मसाप ब्लॉग  

अज्ञात शरद जोशी लोकापर्यंत पोहोचवणे ही लेखन प्रेरणा : वसुंधरा काशीकर

' शरद जोशींना समजून घेताना' या मुलाखतीत प्रतिपादन, मसापतर्फे आयोजन

पुणे : महापुरुषांच्या कर्तृत्वाचा वेध इतिहास घेत असतोच, पण त्या महापुरुषामधील माणसाचा शोध घेणे, त्याचे गर्दीतील एकटेपण, भावभावना, संवेदनशीलतेचा शोध घेणे हा साहित्याचा विषय आहे. वक्ता, लेखक, साहित्याचे अभ्यासक असे शरद जोशींच्या व्यक्तीमत्वाचे अज्ञात पैलू लोकांपर्यंत पोहोचावे ही या लिखाणामागची प्रेरणा होती असे प्रतिपादन 'शरद जोशी-- शोध अस्वस्थ कल्लोळाचा' (राजहंस प्रकाशन) या पुस्तकाच्या लेखिका वसुंधरा काशीकर यांनी केले. महाराष्ट्र साहित्य परिषद आणि पुणे बुक फेअर यांनी आयोजित केलेल्या 'शरद जोशींना समजून घेताना' या मुलाखतीत त्या बोलत होत्या. प्रा. भक्ती हुबळीकर यांनी त्यांची मुलाखत घेतली. कार्यक्रमाला मसापचे कार्याध्यक्ष डॉ.मिलिंद जोशी, पुणे बुक फेअरचे संयोजन पीएनआर राजन आणि मसापचे कार्यवाह श्री. दीपक करंदीकर तसेच श्रोतृवर्ग उपस्थित होता.


या पुस्तकाचा उद्देश ‘अज्ञात’ शरद जोशी लोकांपर्यंत पोहोचवणे हा होता असे वसुंधरा काशीकर म्हणाल्या. रस्त्यावर संघर्ष करणारे लढाऊ, कठोर शरद जोशी जितके खरे आहेत तितकेच तरल,संवेदनशील ,हळवे आणि गर्दीतील एकटे शरद जोशी ही खरे आहेत. शरद जोशींची रसिकता, तरलता, भावुकता याचबरोबर पुस्तकात तत्वचिंतक असलेले त्यांचे रूपही त्यानी उलगडून दाखविले. वसुंधरा म्हणाल्या की, शरद जोशी हे तत्वचिंतक नेते होते. स्वातंत्र्य हा त्यांच्या सर्व चिंतनाचा आधार आहे. आयुष्यात जास्तीत जास्त निवडीची संधी असणे म्हणजे समृद्ध जीवन अशी त्यांची मांडणी आहे. निवडीचे आणि पर्यायाचे स्वातंत्र्य म्हणजे इंडिया आणि हे स्वातंत्र्य नसणे म्हणजे भारत अशी भारत इंडिया मांडणी त्यांनी उलगडून दाखवली. खुल्या व्यवस्थेची त्यांची मांडणी तुम्हाला समर्थनीय वाटते का ? यावर काशीकर यांनी अनेक उदाहरणे देत स्पर्धेतून ग्राहकांचा फायदा होत असल्याचे पटवून दिले. खुली व्यवस्था म्हणजे चंगळवाद नाही असे सांगून त्यानी त्यामागील अर्थशास्त्रीय विचार स्पष्ट केला.

पुस्तकाला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल विचारले असता त्या म्हणाल्या की कमी काळात या पुस्तकाची दुसरी आवृत्ती आली. शेतकरी वाचकांपेक्षा ललित साहित्याच्या मध्यमवर्गीय वाचकाला हे पुस्तक भावले, 24 वर्षाच्या अमेरिकेतील तरुणापासून तर 85 वर्षाच्या वृद्धापर्यंत अनेकांनी हे पुस्तक आवडल्याचे कळवले. प्रा. मिलिंद जोशी यांनी प्रास्ताविक केले. दीपक करंदीकर यांनी आभार मानले.



Featured Posts
Recent Posts
Archive
Search By Tags
No tags yet.
Follow Us
  • Facebook Basic Square
  • Twitter Basic Square
  • YouTube Social  Icon
bottom of page