मसाप ब्लॉग  

गदिमा...बाबूजी अन् बेरजेचे राजकारण

October 8, 2018

'मसाप गप्पा' या कार्यक्रमात 'पुत्र सांगती'मध्ये अनेक आठवणींना मिळाला उजाळा

 

पुणे : 'गीतरामायण कार्यक्रमाच्या रॉयल्टीवरून बाबूजी आणि गदिमा यांच्यामध्ये दुरावा वाढला. त्यांचा संवाद बंद झाला. महाराष्ट्राचे खूप नुकसान होईल, असे प्रत्येकजण म्हणू लागला. दरम्यान, सैनिकांच्या कल्याण निधीसाठी पुण्यात एका कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आले होते. यशवंतराव आणि गदिमा यांचे मैत्र 'चले जाव'चळवळीपासूनचे. त्यांनी एकमेकांना बघताच घट्ट मिठी मारली. यशवंतरावांनी बाबूजींनाही जवळ घेतले. 'तुम्ही दोघे महाराष्ट्राचे सांस्कृतिक शिलेदार आहात. तुम्ही मिळून हा गड राखा,अन्यथा मोठे सांस्कृतिक नुकसान होईल,' असे सांगून यशवंतरावांनी त्यांचे हात उंचावून समेट घडवला. यशवंतरावांनी केलेल्या बेरजेच्या राजकारणाचा हा गोड प्रसंग रसिकांनी सोमवारी अनुभवला. गदिमा, बाबूजी आणि यशवंतरावांबद्दल प्रत्येकाच्या मनातील जिव्हाळा, आदर या प्रसंगाने उजळून निघाला नसता तरच नवल!

निमित्त होते, थोर कवी ग. दि. माडगूळकर अर्थात गदिमांच्या जन्मशताब्दीनिमित्त महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे आयोजित 'पुत्र सांगती' या कार्यक्रमाचे.. गदिमांचे पुत्र श्रीधर माडगूळकर,आनंद माडगूळकर आणि शरतकुमार माडगूळकर यांनी गदिमांच्या आठवणींना उजाळा दिला. प्रसिद्ध निवेदक अरुण नूलकर यांनी त्यांच्याशी संवाद साधला. शरतकुमार माडगूळकर यांनी यशवंतरावांचे मोठेपण सांगून ऐतिहासिक प्रसंगाची आठवण करून दिली.यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे विश्वस्त मंडळाचे सदस्य मा. उल्हासदादा पवार, कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे आणि कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार उपस्थित होते. 

'अण्णांची मोठी अंत्ययात्रा निघाली, तेव्हा वडिलांनी किती मोठे काम केले आहे ते लक्षात आले. आमचे वडील आजही समजलेले नाहीत,' असे माडगूळकर यांनी सांगितले.

 

श्रीधर माडगूळकर म्हणाले, 'गीतरामायण पुन्हा होणार नाही. गदिमांची मुलं म्हणून खूप आनंद वाट्याला आला. विविध क्षेत्रातील दिग्गजांना भेटता आले. राजकारण चिखलातच असते. जितकी मोठी उडी तितका अधिक चिखल अंगावर उडणार, पण म्हणून ते सोडायचे नसते, असे अण्णा नेहमी सांगत.'

'अण्णांसमोर गीतरामायण गाण्याची संधी एकदाच मिळाली. पु. भा. भावे घरी आले, तेव्हा गाणे म्हणं, असे अण्णांनी सांगितले. नंतर पराधीन आहे जगती म्हणायला सांगितले. या गाण्याचे एखादेच कडवे अण्णांनी ऐकले. त्यांना संगीताची उत्तम जाण होती. आम्ही त्यांच्या लोकप्रियतेचे वलय अनुभवले. मी गेल्यावर कुणी विचारणार नाही. केवळ चौकट छापून येईल,हे गदिमांचे भाकीत मराठी लोकांनी खोटे ठरवले आहे. चाळीस वर्षांनंतरही मराठी समाज गदिमांना विसरलेला नाही. त्यांची जन्मशताब्दी उत्साहात साजरी केली जात आहे,' अशी भावना आनंद माडगूळकर यांनी व्यक्त केली. प्रास्ताविक प्रा. मिलिंद जोशी यांनी केले. सूत्रसंचालन उद्धव कानडे यांनी केले. 

 

 

Please reload

Featured Posts

साहित्य परिषदेतील दुर्मीळ ग्रंथांच्या डिजिटायजेशनचे काम सुरु

January 18, 2018

1/4
Please reload

Recent Posts
Please reload

Archive