मसाप ब्लॉग  

लेखकाचे भरकटलेपण दूर करण्यासाठी लेखनविषयक कार्यशाळा उपयुक्त - डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी

लेखकाचे भरकटलेपण दूर करण्यासाठी लेखनविषयक कार्यशाळा उपयुक्त - डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी

महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे व आणि साहित्य सेतू आयोजित आठ लेखन कार्यशाळांच्या मालिकेचे उद्घाटन अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांच्या हस्ते १४ ऑक्टोबर २०१८ रोजी करण्यात आले.


लेखन आणि साहित्यनिर्मिती ही एक सृजनात्मक प्रक्रिया आहे. लेखक जोपर्यंत अंतर्बाह्य ढवळून निघत नाही, विविध प्रकारच्या आव्हानांना सामोरे जात नाही, वेगवेगळ्या जाणीवांची, अनुभवांची बेरीज करीत नाही तोपर्यंत सकस साहित्यकृती निर्माण होणार नाहीत. त्यामुळे लेखकाचे भरकटलेपण दूर करण्यासाठी लेखनविषयक कार्यशाळा उपयुक्त आहेत असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र साहित्य परिषद आणि साहित्यसेतू पुणे यांनी आयोजित केलेल्या लेखन कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या प्रसंगी व्यासपीठावर मसापचे कार्यवाह प्रमोद आडकर, साहित्य सेतूचे संस्थापक प्रा. क्षितिज पाटुकले आणि सजग नागरीक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर उपस्थित होते.


डॉ. जोशी म्हणाले, जागतिकीकरणांमुळे संपूर्ण जगात एकच भाषा, एकच जीवनपद्धती, एकाच प्रकारचे साहित्य आणि त्यातून संपूर्ण जग म्हणजे एकच बाजारपेठ निर्माण करणे असा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे स्थानिक निर्मिती क्षमता, प्रादेशिक परंपरा, साहित्य, लोककला लयाला जाणार आहेत. अशा वेळी नवीन लेखकांसाठी फार मोठे आव्हान आणि तितक्याच संधी निर्माण झाल्या आहेत विवेक वेलणकर यांनी नवोदीत लेखकांनी तंत्रज्ञानाचा आणि ऑनलाईन पुस्तक वितरण व्यवस्थांचा लाभ घेऊन व्यावसायिक लेखक बनावे असा सल्ला दिला.


🔹 श्री. भालचंद्र कुलकर्णी यांनी ISBN/ISSN क्रमांक म्हणजे काय?, नवीन ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया, नियतकालिकांची नोंदणी याबाबत भालचंद्र कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले🔸 अ‍ॅड. कल्याणी पाठक यांनी कॉपीराईट प्रकार, कॉपीराईट कायद्याचे नियम, फायदे, अधिकार व कॉपीराईट भंग झाल्यास होणारी कारवाई यांची विविध उदाहरणादाखल माहिती दिली.


🔹 प्रा. क्षितीज पाटुकले यांनी लेखन हे व्यावसायिकरित्या करियर म्हणून स्वीकारल्यास अगणित संधी उपलब्ध असल्याचे सांगितले. तसेच लेखक-प्रकाशक करार, ईबुक पब्लिशिंग, ऑनलाइन पुस्तक विक्री याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले.


व्यावसायिक लेखक बना या विषयावर आधारित पहिल्या लेखन कार्यशाळेमध्ये संपुर्ण महाराष्ट्रातील विविध शहरी व ग्रामीण भागातून मिळून एकूण चाळीस व्यक्तींनी उत्साही सहभाग दर्शविला.

सर्व सहभागी व्यक्तींनी या लेखन कार्यशाळेच्या आयोजनावर समाधान व्यक्त करीत पुणे व्यतिरिक्त महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये देखील आयोजन करण्याची विनंती केली.

प्रा. अनिकेत पाटील यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

Featured Posts