पुस्तकांमुळे मने प्रज्वलित होतात : प्रा. मिलिंद जोशी
वाचन प्रेरणा दिनानिमित्त भावे हायस्कूलमधील विद्यार्थ्यांशी संवाद

पुणे : 'पुस्तके केवळ मनोरंजन करीत नाहीत, ती माणसांचे भावविश्व ढवळून काढतात. अनोखे अनुभव देतात. वेदनेवर फुंकर घालतात. जाणिवांचा परिघ विस्तारतात. जीवनाकडे पाहण्याची नवी दृष्टी देतात. पुस्तके मनावर साठलेले निराशेचे मळभ दूर करून मने प्रज्वलित करतात. असे मत महाराष्ट्र परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र साहित्य परिषद आणि पेरूगेट भावे हायस्कूल यांच्यावतीने वाचन प्रेरणा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. 'वाचाल तर वाचाल' हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. मुख्याध्यापक रोहिदास भारमल, पर्यवेक्षक भारती तांबे आणि अनिल गद्रे यावेळी उपस्थित होते. पुस्तकातल्या अनेक कथा, कविता, गमती-जमती सांगत कधी मुलांना खळखळून हसवत तर कधी गंभीर करत प्रा. जोशी यांनी वाचक मैफल रंगवली आणि अभ्यास, गृहपाठ, परीक्षा या गोष्टी विसरत मुलेही वाचनाचे मर्म जाणून घेण्यात दंग झाली. जय लेखन ! जय वाचन ! जय मातृभाषा ! अशा घोषणा देत विद्यार्थ्यांनी वाचन प्रतिज्ञा घेतली.
प्रा. जोशी म्हणाले, "डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना पुस्तकांमुळेच प्रेरणा मिळाली. या पुस्तकांनीच त्यांना कर्तृत्वाच्या आकाशात झेपावण्यासाठी बळ दिले. त्यांनी शून्यातून आपल्या आयुष्याची उभारणी केली. कलाम यांचे जीवन ही स्फूर्ती देणारी गाथा आहे. ती विद्यार्थ्यांनी वाचली पाहिजे. वाचन हा केवळ छंद न राहता तो जीवनशैलीचा भाग बनला पाहिजे. मुलांनी अवांतर वाचन करावे, यासाठी पालकांनी आणि शिक्षकांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. वडीलधारी माणसे वाचन करताना दिसली तरच आपण वाचन करावे असे मुलांना वाटेल. वाचनासाठी वेळ नाही ही तक्रार करणे योग्य नाही. तंत्रज्ञानाचे महत्त्व कोणीही नाकारलेले नाही. तंत्रज्ञानाच्या जोडीला जगण्याचे तत्त्वज्ञान असेल तरच जीवनाचा समतोल साधता येईल. व्यक्तिमत्त्वाचे वैचारिक आणि भावनिक भरणपोषण करण्याचे काम पुस्तकेच करू शकतात. भारती तांबे यांनी प्रास्ताविक केले. गायत्री जवळगीकर यांनी सूत्रसंचालन केले.
