top of page

मसाप ब्लॉग  

लेखकाचे भरकटलेपण दूर करण्यासाठी लेखनविषयक कार्यशाळा उपयुक्त : डॉ. श्रीपाद जोशी

महाराष्ट्र साहित्य परिषद आणि साहित्यसेतू पुणे आयोजित लेखन कार्यशाळेचे उदघाटन


पुणे : लेखन आणि साहित्यनिर्मिती ही एक सृजनात्मक प्रक्रिया आहे. लेखक जोपर्यंत अंतर्बाह्य ढवळून निघत नाही, विविध प्रकारच्या आव्हानांना सामोरे जात नाही, वेगवेगळ्या जाणीवांची, अनुभवांची बेरीज करीत नाही तोपर्यंत सकस साहित्यकृती निर्माण होणार नाहीत. लेखकाचे भरकटलेपण दूर करण्यासाठी लेखनविषयक कार्यशाळा उपयुक्त आहेत असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र साहित्य परिषद आणि साहित्यसेतू पुणे यांनी आयोजित केलेल्या लेखन कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या प्रसंगी व्यासपीठावर मसापचे कार्यवाह प्रमोद आडकर, साहित्य सेतूचे प्रा. क्षितिज पाटुकले आणि सजग नागरीक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर उपस्थित होते. डॉ. जोशी म्हणाले, जागतिकीकरणांमुळे संपूर्ण जगात एकच भाषा, एकच जीवनपद्धती, एकाच प्रकारचे साहित्य आणि त्यातून संपूर्ण जग म्हणजे एकच बाजारपेठ निर्माण करणे असा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे स्थानिक निर्मिती क्षमता, प्रादेशिक परंपरा, साहित्य, लोककला लयाला जाणार आहेत. अशा वेळी नवीन लेखकांसाठी फार मोठे आव्हान आणि तितक्याच संधी निर्माण झाल्या आहेत विवेक वेलणकर यांनी नवोदीत लेखकांनी तंत्रज्ञानाचा आणि ऑनलाईन पुस्तक वितरण व्यवस्थांचा लाभ घेऊन व्यावसायिक लेखक बनावे असा सल्ला दिला.

या कार्यशाळेमध्ये छापिल पुस्तक, ई-बुक, अ‍ॅमेझॉन किंडल बुक, ऑडीओ बुक निर्मिती प्रक्रीया, ऑनलाईन पुस्तक वितरण यावर प्रा. क्षितिज पाटुकले यांनी, एकाच पुस्तकाचे विविध प्रकारचे कॉपीराईटस, त्यांचा आवाका आणि अधिकार याविषयी विषयी अ‍ॅड. कल्याणी पाठक यांनी आणि आय.एस.बी.एन, ऑनलाईन पोर्टल नोंदणी, नियतकालिकांची नोंदणी याबाबत भालचंद्र कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. संपूर्ण राज्यातून कार्यशाळेसाठी नवोदित लेखकांनी गर्दी केली होती. प्रा. अनिकेत पाटील यांनी आभार मानले.


Featured Posts
Recent Posts
Archive
Search By Tags
No tags yet.
Follow Us
  • Facebook Basic Square
  • Twitter Basic Square
  • YouTube Social  Icon
bottom of page