पुढारलेपणाच्या नावाखाली वृत्तपत्रांनी व साहित्यिकांनी इंग्रजाळलेल्या मराठीचा वापर सुरू केल्यामुळे म

पुढारलेपणाच्या नावाखाली वृत्तपत्रांनी व साहित्यिकांनी इंग्रजाळलेल्या मराठीचा वापर सुरू केल्यामुळे मराठी भाषेच्या मूळ अस्तित्वाला धोका निर्माण झाला असून साहित्यिकांनी मराठी भाषेप्रती आपली जबाबदारी ओळखून त्यांच्या साहित्यामध्ये संशोधनपूर्णरित्या मराठी शब्दांचा वापर करावा असे आवाहन, मराठी काका अनिल गोरे यांनी रविवार, 18 नोव्हेंबर रोजी मसाप - साहित्य सेतू पुणे आयोजित "कादंबरीलेखन" कार्यशाळेत व्यक्त केले. या प्रसंगी मसाप पुणे चे प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे व साहित्य सेतूचे संस्थापक प्रा. क्षितिज पाटूकले उपस्थित होते.

*राजेंद्र खेर* यांनी मार्गदर्शन सत्रामध्ये, कादंबरी म्हणजे काय?, कादंबरीचे प्रकार, निवेदन पद्धती, यशस्वी कादंबरी व कादंबरीकार यांची वैशिष्ट्ये व ती वैशिष्ट्ये साकारण्यासाठी लागणारी अभ्यासनीती याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले.

उत्तम कादंबरी लिहिण्याकरिता साहित्यिकांनी मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेतील उत्तमोत्तम कादंबरी वाचन व अभ्यास करून आपली लेखन कौशल्ये वाढवावीत असे मत *डॉ. रवींद्र शोभणे* यांनी व्यक्त केले.

*डॉ. अंजली सोमण व श्रीरंजन आवटे* यांनी आपल्या मार्गदर्शनपर व्याख्यानामध्ये, नवोदित लेखकांनी पुस्तकांसोबत माणसे वाचावीत, माणसांचे स्वभाव, व विविध परिस्थितीमधील त्यांच्या प्रतिक्रिया यांचे जवळून निरीक्षण करावे, व कादंबरीच्या विविध आकृतिबंधांचा अभ्यास करून, कादंबरीच्या विषयानुसार लिखाणाचा फॉर्म निवडावा असे विविध अंगांनी मार्गदर्शन केले.
प्रा. अनिकेत पाटील यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

कार्यशाळेत सहभागी व्यक्तींनी अभिप्राय व्यक्त करताना, कार्यशाळेचा विषय, मुद्दे व आयोजन यावर समाधान व्यक्त करीत, नवोदित लेखकांना लिखाणासाठी प्रेरणा देणारी व विविध साहित्य विषयक शंकांचे अभ्यासपूर्ण निरसन करणारी मार्गदर्शनपर कार्यशाळा आयोजित केल्याबद्दल आनंद व्यक्त करीत साहित्य सेतू व मसाप पुणे यांचे अभिनंदन केले.
