अन पत्रातून उलगडले 'पुलंचे पोस्टिक जीवन

पुणे : माझ्यावरील प्रेमापोटी लोक पोस्टात जातात... कार्ड आणि पाकीट विकत घेतात... शक्ती, वेळ आणि पैसा खर्च करून पत्र पाठवतात... त्यांच्या पत्राची दखल न घेणं हे मला कृतघ्नपणाचे वाटतं म्हणूनच आलेल्या नव्वद टक्के पत्रांना मी उत्तर दिली असं म्हणत सामान्य रसिकांपासून ते दिग्गज कलावंतापर्यंत सर्वांशी पत्राच्या माध्यमातून मैत्र जोडणाऱ्या 'पुलंचे पोस्टीक जीवन' पुलोत्सवात उलगडले आणि उपस्थित रसिकांनी तो मंतरलेला काळ पुन्हा अनुभवला. पुलंनी लिहिलेल्या आणि पुलंना आलेल्या निवडक पत्रांचे अभिवाचन महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रसिद्ध अभिनेते गिरीश कुलकर्णी, अभिनेत्री मधुरा वेलणकर, प्रवीण जोशी यांनी केले. हा दुर्मिळ पत्रांचा खजिना ज्योती आणि दिनेश ठाकूर यांनी उपलब्ध करून दिला. या पत्रांची निवड, संकलन आणि संहितालेखन प्रा. मिलिंद जोशी यांनी केले. प्रवीण जोशी यांनी कार्यक्रमाचे दिग्दर्शन केले. अकरावीत शिकणाऱ्या मुलांनी मार्गदर्शन मिळावे यासाठी पुलंना लिहिलेले पत्र आणि उपदेश न करता पुलंनी हसत खेळत वडीलकीच्या नात्याने दिलेले उत्तर, लग्न जमलेल्या तरुणाला सुखी संसारासाठीची सूत्र सांगणारे पुलंचे पत्र, लग्न मोडायला निघालेल्या तरुणीला पुलंनी लग्नासारख्या नाजूक विषयावर केलेलं मार्गदर्शन आणि रॉयल्टी न देता गुपचूप 'अंमलदार नाटकाचे' प्रयोग करणाऱ्या नाटक मंडळांची पुलंनी काढलेली खरडपट्टी अशा वेगवेगळ्या विषयावरच्या पत्रांचे अभिवाचन 'पुलंमधला माणूसपणाचं' दर्शन घडविणारे ठरले. 'वाऱ्यावरची वरात' चा प्रयोग पाहून त्यातल्या विधानांवर आक्षेप घेणाऱ्या आणि पुलंना सद्भिरुचीचे विस्मरण झाले आहे असा आक्षेप घेणाऱ्या बाईंना देवाने यांना 'विनोद बुद्धी' द्यावी अशा आशयाचे पत्र पुलंनी पाठविले. त्याचे अभिवाचन ऐकताना सभागृह हास्यकल्लोळात बुडून गेले. गदिमा, भीमसेन जोशी, वसंतराव देशपांडे, अलका देव मारुलकर, स्वामी विज्ञानानंद या दिग्गजांना लिहिलेल्या पत्रातून पुलंचं 'गणगोत' उलगडलं आणि पुलंच्या निधनानंतर सुनीताबाईंनी पुलंना लिहिलेल्या पत्राचे अभिवाचन सुरु असताना सभागृह भावुक झालं.