अनुवादाअभावी पुलंचे साहित्य प्रादेशिक मर्यादेत अडकले
परिसंवादात मान्यवरांनी व्यक्त केली खंत

पुणेः- ''जीवनातील नवरसांना आपल्या प्रतिभेची जोड देत योग्य ठिकाणी मार्मिक टिपणी करून हसवता हसवता डोळ्यांच्या कडा ओलावणाऱ्या पुलंच्या भाषा प्रभुत्वाला रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली. पण आपल्या साहित्यातून जगाची सफर घडविणाऱ्या पु.लं.चे साहित्य हे अनुवादाअभावी प्रादेशिक मर्यादेत अडकले'' अशी खंत मान्यवरांनी आज परिसंवादात व्यक्त केली.
निमित्त होते ’पु. ल. परिवार’ आणि ’आशय सांस्कृतिक’च्या वतीने आणि ’स्क्वेअर १’च्या सहयोगाने आयोजित पुलोतत्सवात आज आयोजित ’भाषा प्रभु पु. ल.' या विषयावरील परिसंवादाचे. या परिसंवादात डॉ. आशुतोष जावडेकर, रेखा इनामदार साने, गणेश मतकरी आणि मंगला गोडबोले सहभागी झाले होते.
यावेळी बोलताना डॉ. आशुतोष जावडेकर म्हणाले की, पुलंनी मराठी साहित्य रसिकांना दर्जेदार साहित्याची देणगी दिली. पुलंमुळे खऱ्या अर्थाने व्यक्तीचित्र आणि प्रवासवर्णनांना प्रतिष्ठा प्राप्त झाली. यावेळी जावडेकरांनी पुलंची 'अपुर्वाई' अधिक विस्तृतपणे उलगडली.
यावेळी बोलताना रेखा इनामदार साने म्हणाल्या की, बहुआयामी लेखनातून पु.ल. देशपांडे यांनी साहित्य विश्वात मोलाची भर घातली आहे. विनोदी लेखन, प्रवासवर्णने, नाटक, व्यक्तिचित्रणात्मक लेखन अशा विविधांगी लेखनातून त्यांनी मराठी साहित्य प्रगल्भ तर केले. रेखा इनामदार साने यांनी पुलंची बहुभाषेवरिल संपन्नता रसिकांसमोर सहज आणि ओघवत्या शैलीत मांडली.
यावेळी बोलताना गणेश मतकरी म्हणाले की, पुलंच्या नाटकांमध्ये व्यक्तीरेखांचे चित्रण आणि त्या व्यक्तींची वेगळी फिलॉसॉफी असते. 'लास्ट अपॉईंटमेंट' या नाटकाचे नेपथ्य आणि साधेपणा, भेदकता आजही अंगावर काटा आणते.
मंगला गोडबोले यांनी पु.लं.च्या साहित्याबद्दल चर्चा करतानाच, आजच्या काळात अशा दर्जेदार साहित्याची वाचकांच्या मनावर भूरळ आहे, ही अत्यंत अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उद्धव कानडे यांनी केले.


