पंढरपूर येथे एक डिसेंबरला मसापचे समीक्षा संमेलन अध्यक्षपदी डॉ. नागनाथ कोत्तापल्ले आणि प्रा. वसंत आबा
पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा पंढरपूर व कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यामाने शनिवार दि. ०१ डिसेंबर रोजी एक दिवसीय समीक्षा संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांची निवड करण्यात आली असून संमेलनाचे उदघाटन प्रा. वसंत आबाजी डहाके यांच्या हस्ते होणार आहे अशी माहिती महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली.
यावेळी स्वागताध्यक्ष आमदार भारतनाना भालके, आमदार दत्तात्रय सावंत, मसापचे प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार, समीक्षा संमेलनाचे निमंत्रक सुरेश देशपांडे, संयोजक कल्याण शिंदे, मसाप सोलापूर जिल्हा प्रतिनिधी पद्माकर कुलकर्णी व जे. जे. कुलकर्णी तसेच साहित्य परिषदेच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य, स्वेरी कॉलेजचे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे, नगराध्यक्षा साधनाताई भोसले, रयत शिक्षण संस्थेचे सदस्य राजूबापू पाटील, उपनगराध्यक्ष विशाल मलपे, प्रशांत शिंदे हे उपस्थित राहणार आहेत.
पहिल्या सत्रात 'आजची समीक्षा समकालीन साहित्याला न्याय देते का?' या विषयावर समीक्षक प्राचार्य डॉ. महेंद्र कदम यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या चर्चासत्रात प्रा. डॉ. सुहास पुजारी, प्रा. डॉ. राजशेखर शिंदे, आणि प्रा. डॉ. अरुण कुलकर्णी हे आपले विचार व्यक्त करणार आहेत. तसेच दुपारच्या सत्रात जेष्ठ ग्रामीण साहित्यिक व समीक्षक डॉ.द.ता.भोसले यांची मुलाखत होणार असून सुनील जवंजाळ व प्रा.डॉ.चांगदेव कांबळे हे मुलाखत घेणार आहेत.
तिसऱ्या सत्रात सोलापूर विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. देविदास गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली खुले निबंध वाचन होणार आहे. आणि शेवटी समारोप सत्र नागनाथ कोत्तापल्ले यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून, मनोरमा परिवाराचे अध्यक्ष श्रीकांत मोरे, महाविद्यालयाचे प्राचार्य अशोक भोईटे, मसाप पुणे शहर प्रतिनिधी शिरीष चिटणीस, महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. एन. एन. तंटक, प्रा. बी. जे. तोडकरी, डॉ. एस. एस. माने हे उपस्थित राहणार आहेत.