गडकरी समजावण्याचा नव्हे तर अनुभवण्याचा विषय : विनय हर्डीकर

पुणे : राम गणेश गडकरी समजुन घेण्यासाठी आधी शेक्सपिअर समजून घ्यावा लागतो. मात्र गडकरींना गुरू माणणार्यांनी त्यांना समजून घेतलेच नाही. गडकरी हा समजावून सांगण्याचा विषय नाही. तर अनुभवण्याचा विषय आहे. असे मत ज्येष्ठ विचारवंत विनय हर्डीकर यांनी शुक्रवारी व्यक्त केले.
लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्था आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने राम गणेश गडकरी साहित्य महोत्सव महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाचे उद्घाटन हर्डीकर यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, शिरीष चिटणीस, डॉ. वर्षा तोडमल, प्रा. विश्वास वसेकर उपस्थित होते.
हर्डीकर म्हणाले, 'गडकरी हे स्वयंभू होते. त्यांच्या नंतरच्या नाटककारांनी गडकरींच्या नाटकांतील सर्व आयाम घेतले. मात्र त्यांच्या सारखा नाटककार झाला नाही. त्यांच्याकडे अफाट कल्पनाशक्ती, सात्वीक विनोद , व्यक्तीचित्रण, निसर्गाचा अभ्यास होता. त्यांनी नाटके, अभंग, कविता, विनोदी लेख लिहले. गडकरींच्या नाटकांत नऊ रसांचा समावेश आहे. गडकरींच्या नाटकातील विनोदामागे कारूण्य दडलेले असायचे. त्यामुळे गडकरीसारखा नाटकार होणे नाही.'
प्रा. जोशी म्हणाले, 'गडकरी हे प्रतिभेचे उतुंग शिखर आहे. गडकरी यांची बुद्धीमत्ता आणि मार्मिकता पाहून कोल्हटकरही प्रभावीत झाले होते. त्यांच्याडे विलक्षण विनोद बुद्धी होती. गडकरींच्या भाषा वैभवाचा तरूणांनी अभ्यास केला पाहिजे. गडकरींच्या साहित्याचे चिंतनही झाले पाहिजे.'
स्वप्निल पोरे यांनी प्रास्ताविक केले. शिरीष चिटणीस यांनी महोत्सव आयोजनामागची भुमिका स्पष्ट केली. श्रीकांत चौगुले यांनी सुत्रसंचालन केले.
