top of page

मसाप ब्लॉग  

मराठी मुले नोकरीत अडकलेली : डॉ. प्र. चिं. शेजवलकर

मराठी मुले नोकरीत अडकलेली : डॉ. प्र. चिं. शेजवलकर



पुणे : ''मी माझ्या प्रदीर्घ प्राध्यापकीच्या काळाकडे पाहिले, तर असे जाणवते, की मराठी मुले शिक्षण घेऊन नोकरीच्या मागे लागतात. याउलट इतर समाजातील मुलांना उद्योगांमध्ये रस असतो. स्वत:चा उद्योग स्थापन करून तो वाढवावा, असे मराठी मुलांना त्यांना वाटत नाही,' अशी खंत व्यवस्थापन क्षेत्राचे तज्ज्ञ प्रा. प्र. चिं. शेजवलकर यांनी सोमवारी व्यक्त केली.


महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या 'मसाप गप्पा' या कार्यक्रमात शेजवलकर यांनी आपला जीवनप्रवास उलगडत अनेक गमतीदार किश्श्यांना उजाळा दिला. व्यवस्थापन क्षेत्र, मराठी मुलांची मानसिकता, त्यांना लाभलेला दिग्गजांचा सहवास आणि प्रपंच सांभाळत केलेली प्राध्यापकी या सर्वच पैलूंवर त्यांनी प्रकाश टाकला. संजय गोखले यांनी शेजवलकर यांच्याशी संवाद साधला. मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, कार्यवाह उद्धव कानडे आदी या वेळी उपस्थित होते.


'मराठी मुले अजूनही नोकऱ्यांच्या मागे का पळतात, हा प्रश्न आहे. इतर समाजातील मुलांना उच्चशिक्षण घेऊनही नोकऱ्यांत रस नसतो. मराठी माणसांनी ही मानसिकता आता बदलायला हवी. उद्योजक समाजाची प्रगती घडवत असतात. त्यात मराठी मुलांचा वाटाही असला पाहिजे, ही इच्छा अनेक वर्षांपासून आहे,' असे शेजवलकर यांनी सांगितले. शिक्षण जगताबद्दल बोलताना ते म्हणाले, 'मला पुढच्या सगळ्याच जन्मांमध्ये शिक्षक व्हायचे आहे. विद्यार्थी हेच माझे दैवत आहेत. आज अनेक क्षेत्रांत त्यांनी केलेली प्रगती पाहतो, तेव्हा गहिवरून येते. कामाचे समाधान वाटते.'


'केसांनी गळा कापला'

कार्यक्रमात आयुष्यातील अनेक गमतीदार किश्श्यांना उजाळा देत शेजवलकर यांनी सभागृहात हशा पिकवला. 'पुरोगामी असल्याने आंतरजातीय विवाहाला माझी कधीच 'ना' नव्हती; पण ते जसे वडिलांना कळले, तसे त्यांनी धसकाच घेतला. वडील जसे त्यांच्या मुलींसाठी वर शोधत फिरत असतात, तसे माझे वडील माझ्यासाठी वधू शोधत फिरत होते. लग्नाआधी पत्नीला पहायला गेलो, तेव्हा चहा देऊन ती मागे वळली. मला तिचे केस आवडले आणि मग केसांनीच माझा गळा कापला,' असे सांगताच शेजवलकर यांच्या पत्नी उषा शेजवलकर यांच्यासह संपूर्ण सभागृह खळखळून हसले.


पंतप्रधान पदासाठी शरद पवार पात्रच!

'मला अनेक दिग्गज नेते आणि समाजसुधारकांचा सहवास लाभला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सिद्धार्थ कॉलेजमध्ये नोकरीसाठी घेतलेली मुलाखत, साने गुरूजी यांचे प्रेम एस. एम. जोशी यांचा स्वीय सहायक असताना लाभलेला सहवास अशा अनेक गोष्टी आजही आठवतात. १९५८ ते १९६२ या काळात शरद पवार यांना मी बीएमसीसी महाविद्यालयात शिकवायला होतो. त्या काळीच ही व्यक्ती पुढे जाऊन देशाचा नेता होईल, असे त्यांच्याकडे असलेल्या गुणांवरून वाटायचे. त्यांच्याकडे असलेल्या गुणांमुळे ते पंतप्रधान पदासाठी लायकच आहेत, असे सांगत शेजवलकर यांनी शरद पवार यांचा गुणगौरव केला.


Featured Posts
Recent Posts
Archive
Search By Tags
No tags yet.
Follow Us
  • Facebook Basic Square
  • Twitter Basic Square
  • YouTube Social  Icon
bottom of page