मसाप ब्लॉग  

दिवाळी अंकांचा साचा मोडायला हवा : विनय हर्डीकर

January 30, 2019

दिवाळी अंकांचा साचा मोडायला हवा : विनय  हर्डीकर 

 


पुणे : मराठी माणसाला मागे वळून पहायला आवडते पुढे नाही त्यामुळे भविष्याचा वेध घेणारे लेखन मराठी लेखक करत नाहीत.  स्मरण रंजनात रमणाऱ्या दिवाळी अंकांचा साचा मोडायला हवा असे मत साहित्यिक आणि विचारवंत विनय हर्डीकर यांनी व्यक्त केले.महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या दिवाळी अंक स्पर्धेचा (२०१८) पारितोषिक वितरण समारंभ विनय हर्डीकर यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मसापचे उपाध्यक्ष चंद्रकांतदादा शेवाळे, कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, दिवाळी अंक स्पर्धेचे समन्वयक वि. दा. पिंगळे उपस्थित होते. या स्पर्धेत उत्कृष्ट दिवाळी अंकासाठीचे. अ. स. गोखले स्मृतिप्रीत्यर्थ 'रत्नाकर पारितोषिक' 'ग्राहकहित' या दिवाळी अंकाला, चंद्रकांत शेवाळे पुरस्कृत 'विविध ज्ञानविस्तारकर्ते रावसाहेब मोरमकर पारितोषिक 'वाघूर' या दिवाळी अंकाला, 'मासिक मनोरंजनकार का. र. मित्र पारितोषिक' 'अक्षरधारा' या दिवाळी अंकाला, 'शं. वा. किर्लोस्कर पारितोषिक' 'दक्षता' या दिवाळी अंकाला, त्याच बरोबर डेलिहंट पुरस्कृत उत्कृष्ट ऑनलाईन दिवाळी अंकाचे पारितोषिक 'बिगुल' या दिवाळी अंकाला, 'जानकीबाई केळकर' स्मृतिप्रीत्यर्थ'उत्कृष्ट बालवाङ्मय दिवाळी अंकाचे पारितोषिक' 'विद्यार्थी' या दिवाळी अंकाला आणि दिवाळी अंकातील उत्कृष्ट कथेसाठीचे 'दि. अ. सोनटक्के पारितोषिक' 'चपराक' या दिवाळी अंकातील विद्या बायास ठाकूर यांच्या 'सुमी' या कथेला  तसेच उत्कृष्ट ललित लेखासाठीचे'अनंत काणेकर पारितोषिक' 'कलासागर' या दिवाळी अंकातील शिरीष पदकी यांच्या 'ग्रीक सॅलेड व ग्रेसच्या कविता' या लेखाला विनय हर्डीकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.  तसेच दिवाळी अंक वाचकापर्यंत पोहोचविणे हे वितरक आणि विक्रेत्यांचे योगदान लक्षात घेऊन  पूनम एजन्सी, संदेश एजन्सी, रोहिणी बुकडेपो, उत्कर्ष आणि रसिक या प्रमुख विक्रेते व वितरकांचाही यावेळी सन्मान करण्यात आला.

हर्डीकर म्हणाले, 'दिवाळी अंक ही केवळ साहित्यिकांची मिरासदारी नाही. साहित्याचे वर्तुळ मर्यादित आहे, ते व्यापक होणे गरजेचे आहे. दिवाळी अंकात लेखक बांधिलकी म्हणून लिहितात संपादक बांधिलकी म्हणून अंक काढतात या पलीकडे जाऊन अर्थकारणाचा गांभीर्याने विचार केला पाहिजे.'

जोशी म्हणाले, "दिवाळी अंकांची संख्यात्मक वाढ होत असताना त्यांची वाङ्मयीन गुणवत्ता हा चिंतेचा विषय आहे. अनेक दिवाळी अंकात तेच ते लेखक वर्षानुवर्षे लिहित असल्यामुळे अंकांना साचलेपण आले आहे. अशा अंकांनी नव्या लेखकांचा शोध घेतला पाहिजे. दिवाळी अंकांना जाहिरातीच्या रूपाने आर्थिक मदत करणे हे समाजातील धनिकांना आपले सांस्कृतिक कर्तव्य वाटत होते. आज ती भावना राहिली नाही. वाचकांच्या अभिरुचीचा पोत बदलल्यामुळे त्यांना ललित साहित्याचा समावेश असलेल्या दिवाळी अंकांपेक्षा माहितीपर दिवाळी अंकांचे आकर्षण वाटते आहे." वि. दा. पिंगळे यांनी प्रास्ताविक केले. प्रकाश पायगुडे यांनी आभार मानले. उद्धव कानडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

 

 

 

 

 

 

 

 

Please reload

Featured Posts

साहित्य परिषदेतील दुर्मीळ ग्रंथांच्या डिजिटायजेशनचे काम सुरु

January 18, 2018

1/4
Please reload

Recent Posts
Please reload

Archive