top of page

मसाप ब्लॉग  

'वंद्य वंदे मातरम' मधून उलगडल्या दिग्गजांच्या आठवणी


पुणे : वंदे मातरम या चित्रपटात पु. ल. आणि सुनीताबाईंनी प्रथमच नायक आणि नायिकेची भूमिका केली होती. या चित्रपटासाठी कथा, पटकथा संवाद आणि गीतलेखन गदिमांनी केले होते. या चित्रपटाला संगीत सुधीर फडके यांनी दिले होते. या चित्रपटाचे निर्माते होते स्वामी विज्ञानानंद. त्यांनीच पुल, गदिमा आणि बाबूजी या प्रतिभावंतांना 'वंदे मातरम' चित्रपटात एकत्र आणले. या चित्रपटाच्या निर्मितीच्या वेळी सेटवर लागणाऱ्या गोष्टी हे प्रतिभावंत आपापल्या घरातून घेऊन येत असत. या चित्रपटाचे दिग्दर्शक राम गबाले यांनी या चित्रपटाची रिळे गांधीहत्येनंतरच्या उसळलेल्या दंगलीत वाचवली. अशा अनेक आठवणींना उजाळा देत मान्यवरांनी पुल, गदिमा बाबूजी आणि मनःशक्ती प्रयोगकेंद्राचे संस्थापक स्वामी विज्ञानानंद यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांना अभिवादन केले. मनःशक्ती प्रयोगकेंद्र, लोणावळा, महाराष्ट्र साहित्य परिषद आणि राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय यांनी संयुक्तपणे या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि. द. फडणीस प्रमुख पाहुणे होते. ज्येष्ठ गायक श्रीधर फडके, गदिमांचे नातू सुमित्र माडगूळकर, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम मनःशक्ती केंद्राचे कार्यकारी विश्वस्त प्रमोदभाई शिंदे, विश्वस्त गजानन केळकर, मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार यावेळी उपस्थित होते. यावेळी वंदे मातरम चित्रपटातील गीते राजीव बर्वे, अंजली मालकर, शाहीर हेमंत मावळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी सादर केली. प्रसिद्ध गायक श्रीधर फडके यांनी 'वंद्य वंदे मातरम' हे गीत सादर केले. डॉ. वर्षा तोडमल यांनी सूत्रसंचालन केले. शि. द. फडणीस म्हणाले, "स्वामी विज्ञानानंद म्हणजेच पूर्वाश्रमीचे पु. रा. भिडे हे अलौकिक प्रतिभावंत होते. त्यांच्या मनःशक्ती मासिकासाठी मी चित्रे काढली. पुल, गदिमा बाबूजी आणि स्वामी विज्ञानानंद या चारही प्रतिभावंतांचा मला जवळून सहवास लाभला. सुधीर फडके यांच्या साहित्य परिषदेत झालेल्या विवाह सोहळ्याला मी उपस्थित होतो."

प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, पुल, गदिमा बाबूजी, स्वामी विज्ञानानंद यांची सर्जनाची क्षेत्रे वेगवेगळी असली तरी त्यांच्यात सुसंवाद होता. वंदे मातरम चित्रपटाचा काळ हा सर्वांच्याच उभारणीचा काळ होता. या काळातले या दिग्गजांमधले स्नेहबंध निकोप होते. जे करायचे ते उत्तम या ध्यासातूनच या मंडळींकडून उत्तम कलाकृती निर्माण झाल्या.


Featured Posts
Recent Posts
Archive
Search By Tags
No tags yet.
Follow Us
  • Facebook Basic Square
  • Twitter Basic Square
  • YouTube Social  Icon
bottom of page