'स्वामी स्वरूपानंद हे साधकांकडून साधना करवून घेणारे आधुनिक संतसत्पुरुष' : डॉ. अजित कुलकर्णी
पुणे : स्वामी स्वरुपानंद यांनी अनेक ग्रंथ लिहिले त्यापैकी त्यांचा ओवीबद्ध 'अमृतधारा' हा ग्रंथ सुद्धा विशेष आहे. स्वामी स्वरूपानंदानी आपले अंतःकरण आत्मारामापुढे उघड केले. त्यामुळे त्यांच्या जीवनांतील ध्येयासक्ती संपन्न झालेली दिसते. कोणत्याही साधकाला आत्मसाक्षात्कार झाला तरी प्रारब्धभोग भोगावेच लागतात. अशा सोहम साधनेच्या शिकवणुकीतून त्यांनी समाजाला दिव्यत्वाचा समीप नेण्याचे कार्य केले. स्वामी स्वरूपानंद हे स्वामी स्वरूपानंद हे साधकांकडून साधना करवून घेणारा आधुनिक संतसत्पुरुष होते असे मत डॉ. अजित कुलकर्णी यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे आयोजित प. पू. परमहंस स्वामी स्वरूपानंद स्मृती व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. अजित कुलकर्णी हे 'स्वामी स्वरूपानंदांचे 'अमृतधारा - एक विचार मंथन' या विषयावर ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र साहित्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार, कार्यवाह दीपक करंदीकर, वसंतराव देसाई उपस्थित होते.
डॉ. कुलकर्णी म्हणाले, ' देवाकडे स्वतःसाठी काहीही न मागता दुसऱ्यासाठी, समाजासाठी एखादे मागणे मागा तसेच जीवन जगताना भोगवादाकडे जायचे टाळा, अशा प्रकारची शिकवण स्वामींनी समाजाला आपल्या लेखन व सत्कार्यातून दिली. प्रास्ताविक सुनिताराजे पवार यांनी केले. आभार प्रकाश पायगुडे यांनी मानले. दीपक करंदीकर यांनी सूत्रसंचालन केले.