'नमन वीरतेला' या कार्यक्रमातून 'मसाप' मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांना अभिवादन

पुणे : 'नमन वीरतेला', नमन शूरतेला, नमन मृत्युंजयवीराला, अशा खणखणीत आवाजात पोवाडे सादर करून स्वातंत्र्यवीर सावरकरांना ५३ व्या पुण्यतिथीनिमित्ताने आदरांजली वाहण्यात आली. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात स्वातंत्र्यवीर सावरकरांची 'नात' शाहीर विनता जोशी आणि सहकारी यांच्या 'नमन वीरतेला' या कार्यक्रमाचे खास आयोजन करण्यात आले होते.
शाहीर विनता जोशी यांनी सावरकरांचे अद्भुत जीवनकार्य पोवाड्यातून उभे केले. येसूवहिनीला पाठवलेले पत्र त्यांनी क्रांतीकार्याचे घेतलेले व्रत, 'जयदेव, जयदेव, जय श्री शिवराया' ही सावरकरांनी शिवाजी महाराजांची केलेली आरती, भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारकांचे क्रांतिकार्य व त्यातील सावरकरांचे योगदान, गोविंदस्वामी आफळे यांनी रचलेला 'वीर सावरकरांवरील पोवाडा' अस्पृश्यांना मंदिरात प्रवेश मिळावा यासाठीचे सावरकरांचे प्रयत्न व 'मला देवाचे दर्शन घेऊ द्या की र' ही गीतबद्ध झालेली अस्पृश्यांची भावना, १८५७ च्या स्वातंत्र्य समराचा इतिहास, या सर्व विषयांना पोवाड्यांच्या चौकातून (कडवे) शाहीर विनता जोशी यांनी सादर केले. त्यांना शोभा ठाकूर व दीपा पुरोहित यांनी पोवाडे गायनात सहभाग दिला.
कार्यक्रमाच्या शेवटी झाशीच्या राणीचा पोवाडा व स्वतः सावरकरांनी रचलेले 'शस्त्रगीत' विनता जोशी यांनी सादर केले. यावेळी मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार व कार्यवाह दीपक करंदीकर उपस्थित होते. प्रा. मिलिंद जोशी यांनी प्रास्ताविक केले. प्रकाश पायगुडे यांनी आभार मानले.
