मराठी सापडली विचित्र तावडीत : प्रा. हरी नरके मराठी राजभाषादिनी मसापमध्ये पुरस्कार वितरण

पुणे : सध्याचे राज्यकर्ते भाषाप्रेमी, कलाप्रेमी असतील, असे वाटले होते पण गेल्या साडेचार वर्षात अभिजात दर्जाबाबत काहीच घडले नाही. राजकीय इच्छाशक्तीच मेलेली असल्याने ही परिस्थिती उदभवली आहे. भाषा धोरण, मराठी विद्यापीठ, अभिजात दर्जा असे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. पाच वर्षात मराठी विचित्र तावडीत सापडली आहे. असा टोला साहित्यिक, विचारवंत प्रा. हरी नरके यांनी लगावला.यावेळी मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार उपस्थित होत्या.
महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे कॉन्टिनेन्टल प्रकाशन पुरस्कृत कुसुमाग्रज स्मृती पुरस्कार जालना येथील संजीवनी तडेगावकर यांच्या 'संदर्भासहित' कवितासंग्रहाला प्रदान केला. संस्कृती प्रकाशनाच्या सुनिताराजे पवार यांनाही हा पुरस्कार दिला. द. वा. पोतदार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ डॉ. सचिन जोशी यांच्या 'दुर्गसंवर्धन' या ग्रंथाला विशेष पुरस्कार दिला. रा. श्री. जोग यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सांगली येथील डॉ. वि. दा. वासमकर यांच्या 'मराठीतील कलावादी समीक्षा' या समीक्षाग्रंथाला पुरस्कार देण्यात आला. यासाठी अक्षरदीप प्रकाशनालाही गौरविण्यात आले. शं. ना. जोशी स्मृतिपुरस्कार मकरंद साठे यांच्या 'निवडक निबंध - १ रंगभूमी व साहित्य' या ग्रंथाला दिला. सुहासिनी इर्लेकर स्मृतिपुरस्कार नामदेव गवळी यांच्या 'भातालय' या कवितासंग्रहाला प्रदान करण्यात आला. हे सर्व पुरस्कार प्रा. हरी नरके यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
प्रा. हरी नरके म्हणाले, इतिहासलेखन करणे जोखमीची बाब बनली आहे. धाडसी लिखाण केले की कोणाच्या तरी भावना दुखावल्या जातात. मराठी दिनाच्या निमित्ताने मराठी भाषेची चर्चा होते, आदानप्रदान होते, हेच आशादायक आहे. जी भाषा रोजगार देते, तीच भाषा टिकते. अभिजात दर्जा मिळाल्यास केंद्र शासनाकडून ५०० कोटी रुपयांचा निधी मिळेल. १००० कोटी रुपये मिळाल्यास रोजगार निर्माण होईल. विज्ञाननिष्ठ दृष्टकोनातून भाषेचा विचार व्हायला हवा.
मकरंद साठे म्हणाले, 'आज फॅसिस्ट म्हणवून घेण्यात अनेक जण धन्यता मानतात. जगभरात धार्मिक हिंसा प्रचंड प्रमाणात वाढते आहे. भारतात साहित्य संस्कृतीचे अवकाश छोटे आहे. मात्र संस्कृती ही अन्न, वस्र, निवारा यापेक्षाही महत्त्वाची असते. संस्कृती जग घडवते, मात्र हा घडण्या-घडविण्याचा प्रवास अनेक अडवळणांचा असतो. गोवाद, राष्ट्रवाद, वंशवादाच्या नावाखाली हिंसेला मान्यता देणारे वातावरण तयार झाले आहे. लेखकाचा यातील हस्तक्षेप अर्थवाही असतो. मात्र साहित्याला समाजात स्थान आहे की नाही असा प्रश्न आजच्या परिस्थितीत पडतो. प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, 'शहरात मराठीची अवस्था आयसीयूमध्ये दाखल झाल्याप्रमाणे आहे. ग्रामीण भागात मात्र मराठी प्राणापलीकडे जपली जाते. उद्याच्या साहित्यविश्वाचे नेतृत्व ग्रामीण भागाकडे आहे. ते साहित्य प्रवाहात मोलाची भूमिका बजावत आहे. भाषा केवळ ओठांतून येऊन चालणार नाही. तर ती पोटातून आली पाहिजे. मराठी जोवर पोट भरण्याची भाषा होणार नाही, तोवर तिला प्रतिष्ठा मिळणार नाही. बंडा जोशी यांनी सूत्रसंचालन केले. प्रकाश पायगुडे यांनी आभार मानले.