मसाप ब्लॉग  

विज्ञान साहित्याची चळवळ उभा राहावी : डॉ. फुला बागुल

March 2, 2019

'मसाप' व 'मविप' यांच्यातर्फे विज्ञान दिनानिमित्त व्याख्यान

 

 

पुणे : “विज्ञान कथांमधून विज्ञान शोधाची प्रेरणा मिळते. मराठी विज्ञान साहित्यामध्ये अनेक संभवनीयता आहेत. या संभवनीयतेला अनेक आयाम आणि पैलू आहेत. आजच्या संभवनीयता उद्या वैज्ञानिक क्रांतीमध्ये रूपांतरित होऊ शकतात. त्यामुळे विज्ञान साहित्याची चळवळ उभी राहून नवनवीन विज्ञान साहित्य निर्माण व्हावे,”.असे प्रतिपादन धुळे येथील एस. पी. डी. एम. महाविद्यालयातील संशोधक प्राध्यापक डॉ. फुला बागुल यांनी केले.

महाराष्ट्र साहित्य परिषद आणि मराठी विज्ञान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त माधवराव पटवर्धन सभागृहात 'मराठी विज्ञान साहित्यातील संभवनीयता' या विषयावर आयोजित व्याख्यानात डॉ. फुला बागुल बोलत होते. याप्रसंगी विज्ञान परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. विद्याधर बोरकर, सचिव नीता शहा, साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रकाश पायगुडे आदी उपस्थित होते. 

डॉ. फुला बागुल म्हणाले, "मराठी साहित्यात विज्ञानकथा, कादंबऱ्या आणि कवितेतून मांडलेले कल्पित हे वैज्ञानिक संभवनीयता आहे. हेच कल्पित विज्ञानातील संशोधनाच्या आधारे भविष्यात अनेकदा वास्तव दर्शवणारे असल्याचे आपण पहिले आहे. लेखक-कवी यांनी पूर्वी चंद्र, मंगळ येथे मानवी वस्ती असल्याचे चित्र रंगवले. आज ते चित्र प्रत्यक्षात उतरू पाहत आहे. स्वप्नवत वाटणाऱ्या अनेक गोष्टी विज्ञानाने वास्तवात आणल्या आहेत. मानवी मनात विज्ञान साहित्याने कुतूहल निर्माण केले, तर हेच कुतूहल शमविण्याचे काम विज्ञानातील अनेक शोधांनी केले. या शोधांमागे विज्ञान साहित्यातील हे कल्पित आहे."

प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, "विज्ञानाची पाठ्य पुस्तके मुलांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण करण्यात अपयशी ठरली आहेत. त्यातली क्लिष्ट परिभाषा आणि शिक्षकांनी रंजक पद्धतीने  विज्ञान न शिकविणे यामुळे विद्यार्थी विज्ञान विषयक लेखन वाचत नाहीत कल्पना ते वास्तव हा प्रवास विज्ञान साहित्यामुळे शक्य होऊ शकतो आजवर आपण केवळ विज्ञानाचे पदवीधर तयार केले विज्ञाननिष्ठ समाज मात्र तयार झाला नाही समाजाला विज्ञाना भिमुख करण्यासाठी विज्ञान साहित्याची गरज आहे.”

समाजामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी विज्ञान परिषदेतर्फे सातत्याने विज्ञानविषयक उपक्रम राबवले जातात. आपली मराठी भाषा आणि विज्ञान याचा मेळ घालून दोन्ही गोष्टी समृद्ध करण्याचे कार्ये केले जात आहे. तज्ज्ञांची व्याख्याने, वैज्ञानिक वर्षासहल, विज्ञानविषयक पुस्तकांचे प्रकाशन, विज्ञान रंजनस्पर्धा आदी उपक्रमांचा यात समावेश आहे," असे नीता शहा यांनी प्रास्ताविकात सांगितले. दीपक करंदीकर यांनी सूत्रसंचालन केले. शशी भाटे यांनी आभार मानले.

Please reload

Featured Posts

साहित्य परिषदेतील दुर्मीळ ग्रंथांच्या डिजिटायजेशनचे काम सुरु

January 18, 2018

1/4
Please reload

Recent Posts
Please reload

Archive