'मसाप' करणार डॉ. सरोजिनी बाबर आणि प्रा. त्र्यं. वि. सरदेशमुख यांच्या जन्मशताब्दीनिमित्त सा

पुणे : लोकसाहित्य आणि लोकसंस्कृतीच्या ज्येष्ठ अभ्यासक डॉ. सरोजिनी बाबर आणि ज्येष्ठ कादंबरीकार समीक्षक त्र्यं. वि. सरदेशमुख यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा विसर महाराष्ट्र शासनाला पडला असला तरी या सारस्वतांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त महाराष्ट्रभर त्यांच्या साहित्याचा जागर मसापच्या शाखांच्या माध्यमातून करण्यात येईल असा निर्णय महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला अशी माहिती परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली. मसापच्या कार्यकारी मंडळाची बैठक प्रा. मिलिंद जोशी यांच्या अध्यक्षतेखाली मसापच्या माधवराव पटवर्धन सभागृहात संपन्न झाली. यावेळी प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार यांच्यासह जिल्हा प्रतिनिधी उपस्थित होते.

या बैठकीत १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२० या कालावधीसाठी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळावर मसापच्या तिसऱ्या प्रतिनिधी म्हणून सुनीताराजे पवार यांची निवड करण्यात आली. "मसापचे या वर्षीचे विभागीय साहित्य संमेलन इचलकरंजीला, युवा साहित्य नाट्य संमेलन पाटणला, (जि. सातारा), समीक्षा संमेलन धुळ्याला आणि शाखा मेळावा कल्याणला घेण्यात येणार आहे. विभागीय कार्यवाह म्हणून डॉ. शशिकला पवार (धुळे) आणि दशरथ पाटील (सांगली) यांची निवड करण्यात आली. युवा साहित्य नाट्य संमेलनाच्या नियंत्रक पदी जयंत येलूलकर (नगर), विभागीय साहित्य संमेलनाच्या निमंत्रक पदी कल्याण शिंदे (पंढरपूर ), समीक्षा संमेलनाच्या निमंत्रक पदी रावसाहेब पवार (सासवड), बालकुमार संमेलनाच्या निमंत्रकपदी माधव राजगुरू (पुणे) यांची निवड करण्यात आली. पुसेगाव, चाफळ, नाशिक (सिडको) येथील मसापच्या नव्या शाखांना मंजूरी देण्यात आली. असेही प्रा. मिलिंद जोशी यांनी सांगितले.
निधी संकलन समिती :
वाढलेली सदस्यसंख्या, बँकांचे घटलेले व्याजदर, विविध उपक्रमांवरचा वाढता खर्च आणि दिवसेंदिवस योगक्षेमार्थ मिळणाऱ्या देणग्यांचा आटत चाललेला ओघ यामुळे भविष्यात परिषदेला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी निधी संकलन समिती गठीत करण्यात आली असून त्या समितीत प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार, जयंत येलूलकर, विनोद कुलकर्णी, राजन लाखे, तानसेन जगताप, डॉ. सतीश देसाई यांचा समावेश करण्यात आला आहे.