जागतिक महिला दिन हा साजरा करण्याचा दिवस नाही, तो आत्मचिंतनाचा दिवस आहे : डॉ अश्विनी धोंगडे

पुणे : जागतिक महिला दिन हा महिलांनी स्वतःविषयी आणि स्वतःच्या परिस्थितीविषयी गांभीर्याने विचार करण्याचा दिवस आहे. आज महिला दिनाच्या सोशल मिडीयावर पावसासारख्या शुभेच्छा पडत आहे. शुभेच्छा देऊन जबाबदारीतून मुक्त झाल्यासारखे त्यांना वाटते ही अतिशय चिंतनीय बाब आहे. जागतिक महिला दिन हा साजरा करण्याचा दिवस नाही तर तो आत्मचिंतनाचा दिवस आहे. असे मत डॉ अश्विनी धोंगडे यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त 'स्त्री एक 'अ'क्षर ओळख' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी त्या बोलत होत्या. व्यासपीठावर कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार, मंजुषा उकिडवे, मृणाल धोंगडे आणि राधिका जाधव उपस्थित होत्या.
डॉ. अश्विनी धोंगडे म्हणाल्या, 'महिला आजही भेदभाव करताना आपल्याला दिसतात. काळ्या महिला, गोऱ्या महिला, सुशिक्षित महिला, गावंढळ महिला, श्रीमंत महिला, गरीब महिला अशा प्रकारचे भेदभाव आजही आपल्या समाजात पाहायला मिळत आहे. ही अत्यंत चिंतनीय बाब आहे. ज्यासाठी युनोने जागतिक महिला दिन सुरु केला, त्यापासून आपण दूर जात आहोत. जागतिक महिला दिनाला इव्हेन्टचे स्वरूप आले आहे. आपल्यातील संवेदना हरवत चालली आहे.'
सुनिताराजे पवार म्हणाल्या, 'मसापने आयोजित केलेला हा कार्यक्रम स्त्रियांची प्रतिष्ठा वाढवणारा आहे. माणूस म्हणून स्त्रियांना बरोबरीचा सन्मान प्राप्त झाला पाहिजे. आजही स्त्रियांना उंबरा ओलांडताना रोषाला सामोरे जावे लागत आहे. स्त्रियांच्या छोट्या छोट्या इच्छांना आजही पायदळी तुडवले जात आहे. जागतिक महिला दिन साजरा होत असतानाही आजही स्त्रीला असुरक्षितच वाटत आहे.'
मंजुषा उकिडवे, मृणाल धोंगडे आणि राधिका जाधव यांनी 'स्त्री एक 'अ'क्षर ओळख' या कार्यक्रमात आरती प्रभूंची 'तू तेव्हा तशी तू तेव्हा अशी, विंदा करंदीकरांची 'कर कर करा मर मर मरा', मृणाल पांडे यांची 'दररोज कोंबडा आरवायच्या आधी', तेलगू कवयित्री निर्मला प्रांत यांची 'माझी आई सम्राज्ञी आहे', अश्विनी धोंगडे यांची 'थोडी इथे थोडी तिथे', इंदिरा संत यांची 'एकटी', सुरेश भट यांची 'मी एकटीच' ही गझल तसेच स्पृहा जोशी यांची 'तुम्ही मला शांत बसायला सांगता' अशा अनेक कवितांमधून स्त्रीचा एक चेहरा, काहीशी पारंपरिक आणि काहीशी आधुनिक अशी तिची ओळख, स्त्री नेमकी आहे कशी, तिची अ'क्षर' ओळख, ती अक्षरातून कशी व्यक्त झाली, त्या ओळखीचे विविध कंगोरे कोणते, याचा परिचय मंजुषा उकिडवे, मृणाल धोंगडे आणि राधिका जाधव यांनी कविता आणि गीतांच्या माध्यमातून रसिकांसमोर उलगडून दाखविला. सुनिताराजे पवार यांनी प्रास्ताविक केले. उद्धव कानडे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यवाह दीपक करंदीकर, शहर प्रतिनिधी डॉ, अरविंद संगमनेरकर उपस्थित होते.
