ग्रामीण भागात अस्सल कथाबीजे मिळतात : बबन पोतदार

पुणे : आपल्या आजुबाजूला कथेचे अनेक विषय लेखकाला सापडतात. प्रामुख्याने खेड्यातले ग्रामीण भागात लोकांचे दारिद्र्य, गरिबी, उपासमार, हाल अपेष्टा व्यसनाधिनता आणि चंगळवाद, दादागिरी या संदर्भातली पुष्कळ कथाबीज लेखकाला मिळतात. स्त्री आणि पुरुषांची टोकाची मानसिकता ग्रामीण भागात जास्त प्रमाणात पाहायला मिळते. मुळातच स्त्री ही सोशिक व सहनशील असते. काळीज पोखरून टाकणारे बरे वाईट प्रसंग आणि त्यातून निष्पन्न होणारी अस्सल कथाबीजे माझा स्वतःचा अनुभव आहे. बालपण सातारा जिल्ह्यातील एका खेडेगावी गेल्यामुळे मी अनेक ग्रामीण कथा लिहिल्या. असे मत ग्रामीण कथाकार बबन पोतदार यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कथासुगंध कार्यक्रमात त्यांच्या कथांचे अभिवाचन महाराष्ट्र कल्चरल सेंटरचे रमा नाडगौडा आणि नरेश गुंड यांनी केले. यावेळी व्यासपीठावर मसापचे प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कार्यवाह वि. दा. पिंगळे उपस्थित होते.
पोतदार म्हणाले, ' 'पकुमावशी' आणि 'बायजाक्का' या दोन्ही कथांचे विषय स्त्रीवादी आहेत. पकुमावशी ही माझ्या मसूर या गावची एक बालविधवा स्त्री. लहानपणीच नवरा देवाघरी गेल्यावर ती माहेरी लहानाची मोठी झाली. काबाडकष्ट करून भावाच्या संसाराला हातभार लावत राहिली. तिलाही मातृहृदय होते याची जाणीव मला पदोपदी होत होती. तिची माया, लळा या सगळ्यांच्या अनुभवातून साकारलेली ही कथा मी २० वर्षांपूर्वी लिहिली. गेल्या वर्षी ९८ व्या वर्षी तिचे निधन झाले.'बायजाक्का' या कथेचा विषय खूपच अस्वस्थ करणारा होता. एक माउली हाडाची काडे करून आपल्या एकुलत्या एक मुलाला मोठं करते प्रसंगी धुणीभांडी आणि शाळेत गोळ्या भिस्किटे विकून ती पतीच्या निधनानंतर संसाराचा गाडा चालवते. मुलगा परजातीतील मुलीशी लग्न करून वेगळा राहतो. मुलाच्या लेखक मित्राला त्या माऊलीचा लळा लागलेला असतो. काही वर्षानंतर लेखक जेव्हा तिला पाहतो तेव्हा तिला वेड लागलेले असते. अशा आशयाची ही कथा अर्थात मला आलेला एक वास्तववादी अनुभव आहे. स्त्रियांची मानसिकता, ममता, स्वभाव वैशिष्टये मांडताना माझेही डोळे भरून वाहतात.' प्रास्ताविक प्रकाश पायगुडे यांनी केले. दीपक करंदीकर यांनी आभार मानले. सूत्रसंचालन वि. दा. पिंगळे यांनी केले.

