करुणा गोखले, राधिका टिपणीस आणि जोत्स्ना प्रकाशन यांना महाराष्ट्र साहित्य परिषदेचे रेखा ढोले पुरस्कार

पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे आणि राजहंस प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने, राजहंस प्रकाशनाच्या एक अभिन्न सदस्य आणि राजहंस प्रकाशनाच्या पुस्तक निर्मितीच्या कार्याचा अविभाज्य घटक असलेल्या, श्रीमती रेखा ढोले यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ, महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे साहित्यक्षेत्रासाठी पुरस्कार देण्यात येतात. या वर्षी मराठी अनुवाद क्षेत्रातील योगदानाबद्दल दिला जाणारा पुरस्कार ज्येष्ठ अनुवादक करुणा गोखले याना जाहीर झाला आहे. रु. २५०००/- व सन्मानचिन्ह, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

मुखपृष्ठ आणि अंतर्गत सजावटीसाठीचा पुरस्कार 'नोना आणि सफरचंदाचं झाड' आणि ३ पुस्तकांच्या संचासाठी राधिका टिपणीस याना जाहीर झाला आहे. रु. १५०००/- व सन्मानचिन्ह, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. सर्वोत्कृष्ट निर्मितिमूल्याचा पुरस्कार, जोत्स्ना प्रकाशनाला 'नोना आणि सफरचंदाचं झाड' या पुस्तकासाठी जाहीर झाला आहे. रु. १०,०००/- व सन्मानचिन्ह, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

ज्येष्ठ चित्रकार गिरीश सहस्रबुद्धे, श्रीराम गीत, दीपक करंदीकर आणि बंडा जोशी यांच्या निवड समितीने या पुरस्कारासाठी ग्रंथ आणि व्यक्तींची निवड केली. हे पुरस्कार ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहेत. या समारंभाला महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार, राजहंस प्रकाशनाचे दिलीप माजगावकर, डॉ. सदानंद बोरसे उपस्थित राहणार आहेत.
हा समारंभ रविवार दिनांक २१ एप्रिल २०१९ रोजी सायंकाळी ६.०० वाजता पत्रकार भवन, नवी पेठ, पुणे येथे होणार आहे. अशी माहिती मसापचे कार्यवाह बंडा जोशी यांनी दिली आहे.