महाराष्ट्र साहित्य परिषदेचा कृष्णमुकुंद पुरस्कार डॉ. गीतांजली घाटे यांना जाहीर

पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने प्रतिवर्षी संशोधनात्मक लेखनासाठी कृष्णमुकुंद (उजळंबकर) स्मृती पुरस्कार दिला जातो. या वर्षीच्या पुरस्कारासाठी डॉ. गीतांजली घाटे यांच्या 'आक्षिप्त मराठी साहित्य' (कॉन्टिनेन्टल प्रकाशन, पुणे) या ग्रंथास हा पुरस्कार जाहीर झाला आहे. रुपये दहा हजार, सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्कारासाठी जयश्री बोकील आणि डॉ. सुजित तांबडे यांच्या ग्रंथनिवड समितीने या ग्रंथाची निवड केली.
हा पुरस्कार प्रदान समारंभ शनिवार दिनांक २० एप्रिल २०१९ रोजी सायंकाळी ६. ३० वाजता महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात ज्येष्ठ समीक्षक डॉ. मनोहर जाधव यांच्या हस्ते व महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे आणि कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार यांच्या उपस्थितीत होणार आहे. अशी माहिती कार्यवाह बंडा जोशी यांनी दिली.
