यूट्यूब चॅनेलद्वारे प्रत्येकाला सेलिब्रिटी बनण्याची संधी - प्रा. क्षितिज पाटूकले यांचे प्रतिपादन

पुणे : 'सोशल मीडियाच्या युगामध्ये आपली सृजनशील निर्मिती जगभरातील लाखो लोकांपर्यंत थेट पोहोचवून प्रत्येकाला सेलिब्रिटी बनण्याची संधी यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून उपलब्ध झाली आहे,' असे प्रतिपादन प्रसिद्ध लेखक, युट्युबर आणि साहित्य सेतूचे संस्थापक प्रा. क्षितिज पाटूकले यांनी केले. महाराष्ट्र साहित्य परिषदेने आयोजित केलेल्या लेखक, कवी, प्रकाशक यांच्यासाठी युट्यूब चॅनेलची उपयुक्तता या विषयावर व्याख्यान देताना ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, कार्यवाह बंडा जोशी आणि शहर प्रतिनिधी डॉ. अरविंद संगमनेरकर हे उपस्थित होते.
तंत्रज्ञानाने लाखो तरुणांना डिजिटल मीडिया व्यापण्यासाठी विविध कार्यक्षेत्रे तयार होत आहेत. लेखक, कवी, प्रकाशक, कलाकार आणि ज्यांच्याकडे कोणत्याही निर्मितीची व सादरीकरणाची किमान क्षमता आहे अशी व्यक्ती याचा लाभ घेऊ शकते. तंत्रज्ञानाकडे पाहण्याचा नकारात्मक दृष्टिकोन बदलून त्याच्याकडे एक साधन आणि शस्त्र म्हणून पाहणे ही काळाची गरज आहे.
स्मार्टफोनचा कल्पक उपयोग करून आज कित्येक युवक-युवती यूट्यूबच्या माध्यमातून उत्तम कमाई करताना दिसतात. युट्युबचे माध्यम हे आपल्या क्षमतांची परिणामकारकता वाढविण्यासाठी पूरक आणि सहाय्यक आहेत असे प्रतिपादन त्यांनी केले. त्याचबरोबर युट्युब चॅनेल साठी सबस्क्रायबर व व्ह्यूज यांचा गुणाकार कसा करायचा याचे कोडे त्यांनी उलगडून दाखवले. भविष्यातील भारतासाठी उपयुक्त सामाजिक साक्षरतेचे साधन म्हणून युट्युब चॅनेलचा प्रभावी वापर करता येऊ शकेल. सध्या युट्युब चॅनेल वर स्टँडअप कॉमेडी व करमणुकीच्या कार्यक्रमांची चलती आहे. मात्र त्याचबरोबर लहान मुले, युवक, शेतकरी, कामगार, गृहिणी, नेते, प्राध्यापक, लोकसाहित्यिक, ग्रामीण कलाकार, डॉक्टर, वकील, इंजिनिअर, गायक, नर्तक, कवी, व्याख्याते, संगीतकार, चित्रकार यांना देखील युट्युब चॅनेल बनविता येईल. त्याचबरोबर विविध संस्था, महाविद्यालये, कंपन्या, लोकसमूह यांना देखील युट्युब चॅनेलद्वारे विविध संधी निर्माण झाल्या आहेत.
एकदाच निर्मिती, निरंतर उत्पन्न आणि कमाई थेट आपल्या बँक खात्यात जमा ही युट्युब चॅनेलची महत्त्वाची वैशिष्ट्येआहे. यावेळी त्यांनी यूट्यूब चॅनल द्वारे कमाई करणाऱ्या रायन या अमेरिकेतील आठ वर्ष वयाच्या मुलाचे उदाहरण दिले. तसेच मधुरा रेसिपी, भाऊचा धक्का, विष्णू वजार्डे, संदीप यादव या युट्युब चॅनेलची उदाहरणे दिली. २जी पासून ५जी पर्यंतचा तंत्रज्ञानाचा प्रवास व नोकियाच्या हँडसेट पासून आधुनिक आयफोन सारख्या स्मार्टफोनची वाटचाल त्यांनी विषद केली.
युट्युब चॅनेलचे आर्थिक गणित उलगडून दाखवताना चॅनेल निर्मितीसाठी घ्यावी लागणारी काळजी व सावधानता यावरही त्यांनी भाष्य केले.
महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी सोशल मीडिया व युट्यूबद्वारे ग्रामीण व विदेशातील मराठी बांधवांना महाराष्ट्र साहित्य परिषदेशी कसे जोडले आहे त्याचा वस्तुपाठ सादर केला. कार्यक्रमाला लेखक-प्रकाशक आणि युवकांनी गर्दी केली होती.
