पुस्तकदिनाच्या निमित्ताने साहित्य परिषद करणार चित्रकारांचा सन्मान
पुणे : जागतिक पुस्तकदिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र साहित्य परिषदेने यावर्षी मराठी साहित्य विश्वात मोलाचे योगदान देणाऱ्या चित्रकारांचा प्रातिनिधिक सन्मान करण्याचे ठरविले आहे. प्रसिद्ध चित्रकार नाना जोशी, ल. म. कडू, चंद्रमोहन कुलकर्णी, अनिल उपळेकर, रविमुकुल, गिरीश सहस्रबुद्धे, चारुहास पंडितया चित्रकारांचा सन्मान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि. द. फडणीस उपस्थित राहणार असून त्यांच्या हस्ते हे सन्मान केले जाणार आहेत. हा कार्यक्रम पुस्तक दिनाच्या पूर्वसंधेला सोमवार २२ एप्रिल २०१९ रोजी सायंकाळी ६. ३० वाजता महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात होणार आहे. अशी माहिती मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली. प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, 'महाराष्ट्र साहित्य परिषदेने नेहमीच पुस्तक दिनाच्या निमित्ताने वैशिष्टयपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यापूर्वी मसापने रस्त्यावर ग्रंथविक्री करणाऱ्या ग्रंथसेवकांचा तसेच मुद्रितशोधकांचा सन्मान केला होता. यावर्षी मराठी साहित्य विश्वात मोलाचे योगदान देणाऱ्या चित्रकारांचा प्रातिनिधिक सन्मान करताना परिषदेला विशेष आनंद होत आहे. लेखकांइतकेच मुखपृष्ठ करणाऱ्या या चित्रकारांचे स्थान ग्रंथनिर्मितीत महत्त्वाचे आहे.