top of page

मसाप ब्लॉग  

मराठीतील पीएचडी साठीच्या प्रबंधांची गुणवत्ता खालावते आहे : डॉ. मनोहर जाधव यांची खंत


डॉ. गीतांजली घाटे यांना कृष्णमुकुंद पुरस्कार प्रदान

पुणे : आज पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. संशोधनासाठी परिश्रम घेण्याच्या अभावामुळे पीएचडी साठीच्या प्रबंधांची गुणवत्ता मात्र दिवसेंदिवस खालावत आहे. अशी खंत ज्येष्ठ समीक्षक डॉ. मनोहर जाधव यांनी व्यक्त केली. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने, संशोधनात्मक लेखनासाठी 'कै. कृष्ण मुकुंद (उजळंबकर) स्मृती पुरस्कार डॉ. जाधव यांच्या हस्ते 'आक्षिप्त मराठी साहित्य' या ग्रंथासाठी डॉ. गीतांजली घाटे याना प्रदान करण्यात आला. रु. ११,०००/-, सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या पुरस्कारासाठी डॉ. सुजित तांबडे आणि जयश्री बोकील यांच्या ग्रंथनिवड समितीने या ग्रंथाची निवड केली. यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार, कार्यवाह उद्धव कानडे, कै. कृष्ण मुकुंद उजळंबकर यांच्या कन्या नलिनी गुजराथी, जावई मोहन गुजराथी उपस्थित होते.

जाधव म्हणाले, 'पीएचडीच्या प्रबंधांचे पुस्तक करणे हे जिकिरीचे काम असते कारण संशोधनाची क्लिष्ट परिभाषा टाळून साहित्य रसिकांना समजेल अशा सुलभ भाषेत आशयाचे गांभीर्य न हरवू देता पुनर्लेखन आणि संपादन करावे लागते त्यात डॉ. गीतांजली घाटे यशस्वी झाल्या आहेत.'

प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, ' व्यवस्थेला प्रश्न विचारणाऱ्या साहित्यावर नेहमीच आक्षेप घेतला जातो. कलावंताची कला कशी असावी याचे निर्णय शासन आणि समाजातील झुंडी घेऊ लागतात त्यावेळी अभिव्यक्तीचा संकोच होतो, असा काळ हे कलेसाठीचे ऱ्हासपर्व असते.'

गीतांजली घाटे म्हणाल्या, 'मराठी वाङमयाच्या इतिहासाचा पीएचडी साठीच्या प्रबंधांसाठी अभ्यास करताना 'आक्षिप्त मराठी साहित्य' अशी नोंद मिळाली त्यातून हा विषय संशोधनासाठी घेण्याची प्रेरणा मिळाली.' सुनिताराजे पवार यांनी आभार मानले. बंडा जोशी यांनी सूत्रसंचालन केले.


Featured Posts
Recent Posts
Archive