मसाप ब्लॉग  

सर्जनशील साहित्यप्रकार असलेला अनुवाद ही कला : डॉ. अरुणा ढेरे

April 22, 2019

 

पुणे : सर्जनशील साहित्यप्रकार असलेला अनुवाद ही कला आहे, असे मत साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. अरुणा ढेरे यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र साहित्य परिषद, राजहंस प्रकाशन आणि ढोले परिवारातर्फे डॉ. अरुणा ढेरे यांच्या हस्ते अनुवाद क्षेत्रातील योगदानाबद्दल करुणा गोखले याना 'बालाचा बेडूकमित्र आणि इतर' या पुस्तकाचे निर्मितीमूल्य, मुखपृष्ठ व अंतर्गत सजावटीबद्दल राधिका टिपणीस याना आणि हे पुस्तक प्रकाशित करणाऱ्या ज्योत्स्ना प्रकाशनला रेखा ढोले स्मृतिपुरस्कार प्रदान करण्यात आला. त्या प्रसंगी ढेरे बोलत होत्या. मिलिंद परांजपे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. रेखा ढोले आणि डॉ. सदानंद बोरसे यांनी अनुवादित केलेल्या 'भगतसिंगचा खटला-न्यायाच्या हत्येचे कारस्थान' या पुस्तकाचे प्रकाशनही या प्रसंगी करण्यात आले. रेखा ढोले यांची मैत्रीण सुषमा निसळ, डॉ. सदानंद बोरसे परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रवीण ढोले आणि डॉ. श्रीराम गीत यावेळी उपस्थित होते.

ढेरे म्हणाल्या, 'अनुवाद हा जागतिक पातळीवरचा महत्त्वाचा साहित्य प्रकार झाला आहे. केवळ ललित साहित्यच नव्हे, तर वैचारिक आणि वैज्ञानिक विषयावरील लेखनाच्या अनुवादामुळे ज्ञानाची नवी व्यवस्था आपण विकसित करत आहोत. अनुवादकाला आपली सर्जनशीलता एका विशिष्ट परिघात वापरावी लागते. पारिभाषिक शब्दांपेक्षाही मूळ लेखनाची वाचनीयता टिकवून ठेवत रस्ता मोकळा करावा लागतो. शब्दांच्या खिडकीतून काय आत येत आहे हे जाणणारे अनुवादक महत्त्वाचे असतात. आपल्याकडे नृत्य आणि चित्र याविषयीची साक्षरता खूप कमी आहे. भाषा शिकतो म्हणून ती येते. मात्र नृत्य आणि चित्र याकडे दुर्लक्ष होते.

करुणा गोखले म्हणाल्या, 'अनुवादक म्हणून घडण्यात राजहंस प्रकाशनचे मोठे योगदान आहे. मराठीतील साहित्य इतर भाषांमध्ये का जात नाही असे विचारले जाते. अनुवादासाठी मातृभाषा जास्त जवळची वाटते. इंग्रजी माध्यमातून शिकणाऱ्या मुलांना मराठी साहित्य श्राव्य स्वरूपात उपलब्ध करून दिल्यास अनुवादाचे प्रमाण वाढेल, त्यासाठी लेखक, अनुवादक, प्रकाशक आणि विद्यापीठाने सामूहिक प्रयत्नांतून पुढाकार घेतला पहिजे.

परांजपे म्हणाले, 'वाचन संस्कृतीचा कणा असलेले बालसाहित्य दुर्लक्षित राहिले आहे. मुलांच्या पुस्तकांसाठी लेखन, चित्रे यांचा वेगळ्या पद्धतीने विचार करावा लागेल. आपल्याकडे तंत्रज्ञान आहे, पण निर्मितिमूल्यांची उणीव आहे.' उद्धव कानडे यांनी सूत्रसंचालन केले. श्रीराम गीत यांनी  आभार मानले.

 

 

 

 

Please reload

Featured Posts