जिथे शब्द पोहचू शकत नाही तिथे चित्रं पोहचतात : शि. द. फडणीस

साहित्य परिषदेत पुस्तकदिनाच्या निमित्ताने शि. द. फडणीस यांच्या हस्ते चित्रकारांचा सन्मान
पुणे : एकेकाळी पुस्तकांमध्ये शिल्लक असलेल्या जागेत चित्रांचा समावेश केला जायचा पण आता चित्र ही भाषा आहे हे साहित्य विश्वाला पटले आहे. जिथे शब्द पोहचू शकत नाही तिथे चित्र पोहचतात असे मत ज्येष्ठ चित्रकार शि. द. फडणीस यांनी व्यक्त केले. जागतिक पुस्तकदिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र साहित्य परिषदेत यावर्षी मराठी साहित्य विश्वात मोलाचे योगदान देणारे प्रसिद्ध चित्रकार नाना जोशी, ल. म. कडू, चंद्रमोहन कुलकर्णी, अनिल उपळेकर, रविमुकुल, गिरीश सहस्रबुद्धे, चारुहास पंडित या चित्रकारांचा शि. द. फडणीस यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, कार्यवाह वि. दा. पिंगळे उपस्थित होते.
फडणीस म्हणाले, 'अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला देखील ८६ वर्षानंतर चित्रकारांची आठवण झाली आणि चिपळूणच्या संमेलनात 'आमच्या रेषा बोलतात भाषा' या विषयावर परिसंवाद झाला आणि प्रथम चित्रकारांना साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर स्थान मिळाले. चित्रकारांचे महत्त्व साहित्य विश्वाला समजते आहे ही महत्त्वाची गोष्ट आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेने पुस्तक दिनाच्या पूर्वसंध्येला या चित्रकारांचा प्रातिनिधिक सन्मान केला ही निश्चितच अभिनंदनीय घटना आहे.
रविमुकुल म्हणाले, 'पुस्तकातील आशयाला न्याय देणारे मुखपृष्ठ काढले जात आहे, ही महत्त्वाची गोष्ट आहे. प्रकाशक बदलल्यानंतर पुस्तकाचे पूर्वीचे मुखपृष्ठ बदलणे ही गोष्ट चित्रकारांवर अन्याय करणारी आहे.
नाना जोशी म्हणाले, 'ऐन उमेदीच्या काळात माझी दृष्टी गेली तरीही चित्रकलेने माझी साथ सोडली नाही. चित्रकलेने माझ्या आयुष्यात दृष्टी नसतानाही प्रकाश दिला.'
चंद्रमोहन कुलकर्णी म्हणाले, 'केवळ पुस्तकामुळे चित्रकला, शिल्पकला, कॅलिग्राफी, कलादिग्दर्शन या सर्व कलाप्रकांराशी मी जोडला गेलो त्यामुळे पुस्तकांच्या सहवासात खूप काही करता आले. मी पुस्तकांच्या सदैव ऋणात राहीन.'
ल. म. कडू म्हणाले, 'आयुष्यात जी गोष्ट मला आव्हान वाटत होती तीच मला करावी लागली. यातून माझ्यातला चित्रकार घडत गेला.'
प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, 'लेखकाइतकेच साहित्यविश्वातील चित्रकारांचे स्थान महत्त्वाचे आहे. मुखपृष्ठ हे ग्रंथाचे प्रवेशद्वार आहे. या प्रवेशद्वारामुळे वाचकांना साहित्यविश्वात प्रवेश करावासा वाटतो. त्यामुळे साहित्य विश्वाने चित्रकारांबाबत कृतज्ञ असेल पाहिजे.' वि. दा. पिंगळे यांनी सूत्रसंचालन केले.