संमेलनाध्यक्ष निवड प्रक्रियेचा संकोच : प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील

संमेलनाध्यक्ष निवड प्रक्रियेचा संकोच : प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील
अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल प्रा. मिलिंद जोशी यांच्या हस्ते सत्कार
पुणे : 'अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष निवडण्याची आधीची प्रक्रिया व्यापक होती. नव्या प्रक्रियेत अकराशे लोकांऐवजी १९ लोक अध्यक्ष निवडत असल्याने संमेलनाध्यक्ष निवड प्रक्रियेचा संकोच झाला आहे,' असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले-पाटील यांनी केले. महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे आयोजित 'मसाप गप्पा' या उपक्रमात साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी ठाले-पाटील यांच्याशी संवाद साधला. साहित्य महामंडळाचे अध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल ठाले-पाटील यांचा परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार या वेळी उपस्थित होते.
ठाले पाटील म्हणाले, ''लोकशाही प्रक्रियेत एखाद्या निर्णयाच्या बाजूने बहुमत असताना अल्पमताला काही किंमत नसल्याने नव्या प्रक्रियेत तूर्तास तरी बदल होणे शक्य नाही,' अध्यक्षपदाची प्रक्रिया बदलणे, साहित्य महामंडळाने स्वतंत्र संस्था म्हणून वावरणे, संमेलनाव्यतिरिक्त उपक्रम आयोजित करणे, सरकारकडे सतत निधीची मागणी करणे, अशा साहित्य महामंडळ नागपूरला असताना राबवलेल्या धोरणांवर ठाले-पाटील यांनी टीका केली. 'साहित्य महामंडळाला लोकशाहीची चौकट आहे. अध्यक्ष निवडण्याची प्रक्रिया बहुमताने बदलल्यामुळे त्यातील गुण-दोष पाहावे लागतील. प्रयोग करून पाहिल्यानंतर बदल करायचा की नाही, याचा विचार करता येईल. बदल होणे आतातरी शक्य नाही. संस्थेचा अध्यक्ष म्हणून प्रक्रियेचे समर्थन करावे लागेल,' अशी टिप्पणी ठाले-पाटील यांनी केली. पूर्वीच्या निवड प्रक्रियेत द. मा. मिरासदार, शांता शेळके असे अनेक साहित्यिक बिनविरोध निवडून आल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.

ठाले-पाटील म्हणाले,
- साहित्य संमेलन आयोजित करणे, हेच साहित्य महामंडळाचे काम.
- सरकारकडून निधी घेतला, तर मिंधेपणा येतो.
- नव्या लेखक, कवींना व्यासपीठ देण्याची साहित्य संस्थांची जबाबदारी असताना बनचुके लोकांना व्यासपीठ दिले जाते.
- नवीन लेखकांना व्यासपीठ देणे आणि प्रतिष्ठा मिळेपर्यंत विकास घडवणे ही संस्थांची जबाबदारी आहे.
महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे आयोजित 'मसाप गप्पा' या उपक्रमात साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांच्याशी संवाद साधला. सुनिताराजे पवार यांनी आभार मानले. वि. दा. पिंगळे यांनी सूत्रसंचालन केले.