दिलीप माजगावकर यांना 'मसाप जीवनगौरव' आणि नोहा मस्सील यांना भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्क


पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने देण्यात येणारा 'मसाप जीवनगौरव' पुरस्कार ज्येष्ठ लेखक, संपादक आणि प्रकाशक दिलीप माजगावकर यांना जाहीर झाला आहे. वाङमयीन चळवळीसाठी दिलेल्या योगदानाबद्दल परिषदेचा डॉ. भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्कार नोहा मस्सील (इस्राईल) यांना जाहीर झाला आहे.

रोख रक्कम, सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र असे या दोन्ही पुरस्कारांचे स्वरूप आहे. २७ मे रोजी परिषदेच्या ११३ व्या वर्धापनदिन समारंभात परिषदेचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे यांच्या अध्यक्षतेखाली हे पुरस्कार ज्येष्ठ समीक्षक डॉ. सुधीर रसाळ यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहेत. अशी माहिती परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली. प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार, कार्यवाह उद्धव कानडे यावेळी उपस्थित होते.
प्रा. जोशी म्हणाले, 'महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे मराठी साहित्य विश्वाची श्रीमंती आपल्या कार्यातून वाढविणाऱ्या व्यक्तीस 'मसाप जीवनगौरव' पुरस्काराने सन्मानित केले जाते. लेखक, संपादक आणि प्रकाशक म्हणून दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल या पुरस्काराने दिलीप माजगावकर यांना सन्मानित करताना परिषदेला आनंद व समाधान वाटत आहे.
मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृती यांच्या जतन आणि संवर्धनासाठी इस्राईल येथील नोहा मस्सील गेली चाळीस वर्षे कार्यरत आहेत. सातासमुद्रापार असणाऱ्या मराठी कुटुंबात मराठी भाषा आणि संस्कृती टिकून राहावी यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील राहिले आहेत. त्यांच्या प्रयत्नांना प्रोत्साहन देण्यासाठी डॉ. भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. प्रथमच हा पुरस्कार भारताबाहेर दिला जात आहे. असेही प्रा. मिलिंद जोशी यांनी सांगतिले.