मावळ शाखेला उत्कृष्ट मसाप शाखा पुरस्कार आणि नाशिक रोड शाखेला वैशिष्टयपूर्ण शाखा पुरस्कार , रावसाहेब

पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने प्रतिवर्षी वर्धापनदिन समारंभात राजा फडणीस पुरस्कृत उत्कृष्ट मसाप शाखा फिरता करंडक देण्यात येतो. या करंडकाचे या वर्षीचे मानकरी आहेत मसापची मावळ शाखा (जिल्हा पुणे). राजन लाखे पुरस्कृत बाबुराव लाखे स्मृतिप्रीत्यर्थ वैशिष्ट्यपूर्ण शाखा पुरस्कार मसाप शाखा नाशिक रोड (नाशिक) याना देण्यात येणार आहे. तसेच रत्नाकर कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा मसाप कार्यकर्ता पुरस्कार रावसाहेब पवार (मसाप शाखा सासवड ता. पुरंदर जिल्हा पुणे) आणि नरेंद्र फिरोदिया (सावेडी उपनगर शाखा अहमदनगर)

यांना प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्काराचे वितरण सोमवार २७ मे २०१९ रोजी होणाऱ्या वर्धापनदिन समारंभात ज्येष्ठ समीक्षक डॉ. सुधीर रसाळ यांच्या हस्ते होणार आहे. साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. रावसाहबे कसबे समारंभाच्या अध्यक्षस्थानी आहेत. हा समारंभ सायं. ६. ०० वाजता निवारा सभागृह, गांजवे चौक, नवी पेठ येथे होणार आहे. अशी माहिती परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली.