जयवंत दळवी हे चतुरस्त्र प्रतिभेचे साहित्यकार : प्रा. मिलिंद जोशी
साहित्य परिषदेत जयवंत दळवींच्या 'सावित्री' नाटकाचे अभिवाचन

पुणे : जयवंत दळवी यांच्या लेखनात विकार वासनांच्या आवर्तात भोवंडून जाणारी माणसे पदोपदी भेटतात माणसांच्या आयुष्यातील भोगवट्यांचे, अतृप्त वासनांचे आणि सुखदुःखांचे दशावतार त्यांच्या कथा, कादंबरी आणि नाटकात दिसतात आदिम कामेच्छाचे अस्वस्थ करणारे चित्रण त्यांच्या साहित्यात आहे. व्यामिश्र अनुभवांनी अंतर्यामी उदास असणाऱ्या माणसांच्या व्यथा वेदनांना व्यक्त करणाऱ्या जयवंत दळवी यांनी अत्यंत मार्मिक आणि तरल विनोदाचा वस्तुपाठ ठणठणपाळ या टोपणनावाने सदर लेखन करताना वाचकांसमोर ठेवला. दळवी हे चतुरस्त्र प्रतिभेचे साहित्यकार होते असे मत महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी केले. महाराष्ट्र साहित्य परिषद आणि नाट्यगंध पुणे या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने जयवन्त दळवी यांच्या सावित्री नाटकातील निवडक नाट्यांशाचे अभिवाचन डॉ. मधुरा कोरान्ने, चित्रा देशपांडे, रंजना पंडित आणि प्रतिक ढवळीकर यांनी केले, त्यावेळी ते बोलत होते. प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार, कार्यवाह दीपक करंदीकर यावेळी उपस्थित होते.
प्रा. जोशी म्हणाले, आपल्या लेखनातून स्त्री पुरुष नातेसंबंधांचा शोध दळवींनी अनेक कंगोऱ्यातून घेतला आहे. दळवींच्या नाटकांनी मराठी नाटकांच्या अनुभवक्षेत्राची कक्षा वाढवली आणि प्रादेशिकतेची कोंडी फोडली. मध्यमवर्गीयांना सर्वस्वी अपरिचित असलेल्या चित्र विचित्र जीवन संघर्षाचे प्रत्ययकारी चित्रण त्यांच्या साहित्यात आहे. पुरुष, महासागर, लग्न, सावित्री यासारख्या नाटकात त्यांनी लैंगिक वासनेतून निर्माण होणाऱ्या विकृतीच्या, वासनेच्या तळाशी असलेल्या क्रूर प्रवृत्ती यांची धगधगती चित्रं रंगवली आहेत. विलक्षण सहजता हे दळवींच्या लेखनाचे वैशिष्ट्य होते. वाचकांना खिळवून ठेवण्याचे सामर्थ्य त्यांच्या लेखणीत होते. त्यांच्या साहित्याचे गारुड आजही कायम आहे. दळवी माणसात रमणारे असले तरी वृत्तीने एकाकी होते. गर्दीपासून ते नेहमी दूर राहिले ते सभा सम्मेलनात सहभागी झाले नाहीत. दीपक करंदीकर यांनी सूत्रसंचालन केले.