अभिवाचनातून उलगडले प्रातिभ स्नेहबंध जी. ए. आणि सुनीता देशपांडे यांच्या पत्रांचे अभिवाचन

पुणे : मराठी साहित्यातील कथेचे दालन आपल्या कथा साहित्यातून श्रीमंत करणारे कथाकार जी. ए. कुलकर्णी आणि आपला करारी बाणा जपणाऱ्या संवेदनशील लेखिका सुनीता देशपांडे यांच्यातील प्रातिभ स्नेहबंधाचे दर्शन 'रुंग्ली रुंग्लीयॉट' या या कार्यक्रमातून साहित्य रसिकांना घडले. निमित्त होते जी. ए. कुलकर्णी यांच्या ९६ व्या जयंतीचे महाराष्ट्र साहित्य परिषद आणि जी. ए. कुटुंबीय यांच्या वतीने आयोजित विशेष कार्यक्रमात जी. ए. कुलकर्णी आणि सुनीता देशपांडे यांच्या पत्रांचे अभिवाचन अभिनेते गिरीश कुलकर्णी आणि लेखिका माधुरी पुरंदरे यांनी केले. या कार्यक्रमाचे दिग्दर्शन उमेश कुलकर्णी यांनी केले. संगीत मंगेश धावडे यांचे होते. दृश्यरचना सत्यजित पटवर्धन यांच्या होत्या. यावेळी ज्येष्ठ लेखिका मंगला गोडबोले, जीएंच्या भगिनी नंदा पैठणकर, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार उपस्थित होते.
गोडबोले म्हणाल्या, 'नियतीवाद जीएंच्या कथांच्या केंद्रस्थानी आहे. सहनशीलता संपल्यानंतर त्यांच्या कथांमधल्या स्त्रियांनी आत्महत्येचाच मार्ग स्वीकारला. जीए आणि सुनीताबाई या दोघांच्याही पत्रव्यवरातून अनेक तत्कालीन सांस्कृतिक संदर्भ उलगडतात.
प्रा. जोशी म्हणाले, 'मानवी जीवनातील सुखदुःखे आणि त्यांच्या तळाशी असणारे अविनाशी सत्य जीएंनी त्यांच्या कथांतून मांडले. जीएंच्या कथांचे मूल्य हे कालातीत आहे. कथालेखन हा कादंबरी लेखनासाठी केलेला रियाज असतो हा साहित्य विश्वात रूढ झालेला समज जीएंनी दूर केला. आधुनिक काळातील परखड, स्वतंत्र विचाराच्या बुद्धिवंतांमध्ये सुनीता देशपांडे यांचे स्थान खूप वरचे आहे. पतीच्या प्रतिभेच्या लखलखाटात त्यांनी आपले आत्मतेज लुप्त होऊ दिले नाही. जीए आणि सुनीताबाईंच्या पत्रातून त्यांच्यातल्या प्रातिभ स्नेहबंधाचे दर्शन घडते. उद्धव कानडे यांनी सूत्रसंचालन केले.