शाहिरीने दुमदुमली साहित्यपंढरी

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने विशेष कार्यक्रम
पुणे: स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, ग दि माडगूळकर, वसंत बापट या कवींनी लिहिलेल्या शाहिरी काव्याच्या सादरीकरणाने साहित्य पंढरी दुमदुमली. निमित्त होते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र साहित्य परिषद आणि शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'साहित्यिकांची शाहिरी' या विशेष कार्यक्रमाचे शाहीर हेमंतराजे मावळे यांनी त्यांचे सहकारी प्रा. संगीता मावळे, महादेव जाधव, होनराजराजे मावळे, मुकुंद कोंडे, राजकुमार गायकवाड, लक्ष्मण चव्हाण, अरुणकुमार बाभुळगांवकर, सविता वाडेकर, प्रज्ञा काळे आणि पूजा माळी यांच्या समवेत नामवंत कवींचे पोवाडे सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार ,कार्यवाह वि. दा. पिंगळे यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, 'मराठी साहित्यातील काव्यगंगा संतकाव्य, पंतकाव्य आणि तंतकाव्य या तीन पात्रातून वाहते. संतकाव्याने समाजाला प्रबोधनाचा प्रकाश दाखवला. पंतकाव्याने अभिजनांसाठी साहित्य निर्मिती केली तर तंतकाव्याने एकीकडे शाहिरीच्या माध्यमातून शौर्याचे गुणगान केले. तर दुसरीकडे लावणीच्या माध्यमातून सौंदर्याचे गुणगान केले. शाहिरी काव्याने मराठी काव्याला दिलेले योगदान खूप मोलाचे आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या लेखनातून प्रस्थापित साहित्याला धक्का दिला. त्यांनी शोषितांचे जग आपल्या लेखनातून समोर आणले. उपेक्षित आणि वंचित लोकांच्या व्यथा वेदना मांडल्या. त्यांनी विद्रोहाचे रूपांतर विद्वेषात होऊ दिले नाही. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत अण्णाभाऊ साठे यांनी मोलाचे योगदान दिले. प्रकाश पायगुडे यांनी आभार मानले. वि. दा. पिंगळे यांनी सूत्रसंचालन केले.