अंदाजपत्रकामध्ये लिंगसमानता दिसत नाही : डॉ. नीलम गोऱ्हे यांची खंत
महाराष्ट्र साहित्य परिषदेत राजेंद्र बनहट्टी व्याख्यानमाला

पुणे : स्त्रियांच्या दृष्टीने अंदाजपत्रकात अर्थरचना झालेली नाही. महिलांना सक्षम करण्यासाठी त्यांची गरज ओळखून गुंतवणूक करण्यापेक्षा महिला मेळावे, महिलांना सरसकटपणे कांडप मशीन आणि शिलाई मशिन वाटप यासारखे उपक्रम राबवले जातात. अंदाज पत्रकात लिंगसमानता दिसून येत नाही. अशा शब्दात विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्हे यांनी खंत व्यक्त केली. महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे आयोजित राजेंद्र बनहट्टी व्याख्यानमालेत 'स्त्री आणि समाजकारण' या विषयावर डॉ. नीलम गोऱ्हे बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार, चैतन्य बनहट्टी उपस्थित होते.
डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, 'धनदांडगे लोक बँकांची फसवणूक करत असताना महिला बचत गटांच्या माध्यमातून बँकांना उत्पन्न मिळत आहे. मात्र तरीही त्यांना सुविधा दिल्या जात नाहीत. स्त्रियांच्या संदर्भातील सर्व निर्णय पतीने घ्यावेत, अशी समाजरचना रूढ झाली आहे. स्त्री एकटी असेल तर तिचे प्रश्न आणखी तीव्र होतात. स्त्रीचे चांगले-वाईट आम्ही ठरवणार ही धारणा आहे. पोलीस संवेदनशीलतेने तक्रार लिहीत नाहीत. पीडित मुलीलाच शाळेतून काढले जाते. महिला असंघटित क्षेत्रात ढकलल्या जात आहेत. सायबर गुन्हे वाढत आहेत. मानवी व्यापार वाढत आहे. समाजसुधारणांना कायद्यांचा आधार नसेल तर बळ मिळणार नाही. प्रा. मिलिंद जोशी यांनी प्रास्ताविक केले. दीपक करंदीकर यांनी सूत्रसंचालन केले.
चौकट :
कौटुंबिक हिंसाचार सर्व जाती-धर्मात
स्त्रियांनी समाजकारण करावे व राजकारण करू नये, अशी अपेक्षा केली जाते. हा बौद्धिक हिंसाचार असून तो उच्चभ्रू समाजातही आहे. अशा लोकांना परदेशी गेल्यानंतर आपले वागणे बदलले पाहिजे हे कळते आणि ते इथे घरकामात मदत करू लागतात, अशी टिप्पणी डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली.
