संतवाड्मयामध्ये प्रवृत्ती आणि निवृत्ती यांचा समतोल समन्वय : डॉ. अभय टिळक
महाराष्ट्र साहित्य परिषदेत पुरस्कारांचे वितरण

पुणे : समर्थ रामदासांनी प्रवृत्तीपर उपदेश केला आणि इतर संतांनी निवृत्तीपर मार्ग दाखवला, असे नसून समर्थांसह सर्वच संतांनी प्रवृत्ती आणि निवृत्तीचा समतोल समन्वय साधावा असे सांगितले आहे. असे प्रतिपादन ज्येष्ठ अर्थतज्ञ आणि संतसाहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. अभय टिळक यांनी केले. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने डॉ. म. वि. गोखले पुरस्कृत ह. भ. प. कै. सोनोपंत दांडेकर स्मृती पुरस्कार डॉ. श्रीपाद जोशी (इंदोर) आणि कै. रवींद्र भट पुरस्कार संतसाहित्यातील लक्षणीय योगदानाबद्दल मोहनबुवा रामदासी यांना डॉ. अभय टिळक यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार, समर्थ रामदास स्वामी संस्थानचे विश्वस्त व समर्थ वंशज बाळासाहेब स्वामी, आणि स्वामी मकरंदनाथ वझे उपस्थित होते.
प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, 'ज्या संतांनी जात, धर्म आणि पंथ यांच्या भिंती मोडून राष्ट्रीय एकात्मतेच्या पलिकडे जाऊन वैश्विक एकात्मतेची भूमिका मांडली त्या संतांना जाती जातीत विभागण्याचे षडयंत्र आज सुरु आहे. हा पुरोगामी महाराष्ट्राचा पराभव आहे.
या प्रसंगी परीक्षकांच्या वतीने डॉ. अविनाश अवलगावकर यांनी मनोगत व्यक्त केले. हा पुरस्कार म्हणजे आजवर केलेल्या कामासाठी मिळालेला समर्थांचा प्रसाद आहे अशी भावना मोहनबुवा रामदासी यांनी व्यक्त केली. डॉ. श्रीपाद जोशी यांनीही आपले विचार मांडले. प्रकाश पायगुडे यांनी आभार मानले. बंडा जोशी यांनी सूत्रसंचालन केले.