चरित्रकथन आणि अभंग गायनातून साहित्य परिषदेत संत सावतामाळी यांचे पुण्यस्मरण

पुणे : 'ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम... पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम' असा गजर करत निघालेली दिंडी, टाळ मृदूंग आणि चिपळ्यांचा नाद याने भारावलेले माधवराव पटवर्धन सभागृह अशा वातावरणात संत सावतामहाराजांचे चरित्रकथन आणि अभंग गायनातून संत सावतामाळी यांना महाराष्ट्र साहित्य परिषदेत अभिवादन करण्यात आले. निमित्त होते संत सावतामाळी यांच्या पुण्यतिथीचे संत सावतामाळी यांचे चरित्रकथन व अभंग गायनाचा कार्यक्रम वैष्णवी भजनी मंडळातील शोभा कुलकर्णी, स्मिता पिंपळे, मीनाक्षी केळकर, कल्याणी सराफ, मधुरा खिरे, सुजाता कुकडे, राखी भुतडा, आशा संत यांनी सादर केला. संहिता लेखन शोभना कुलकर्णी यांचे होते. त्यांना शिवाजी पाळंदे, माधव खिरे आणि अविनाश असलेकर यांनी पेटी व तबल्याची साथ दिली. यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार, सामाजिक कार्यकर्ते रवी चौधरी उपस्थित होते. यावेळी बोलताना प्रा. जोशी म्हणाले, ' जात, धर्म, पंथ हे समाजातील सारे भेद नष्ट करून संतांनी अध्यात्माचे लोकशाहीकरण केले हे त्यांचे कार्य क्रांतिकारी आहे. प्रपंच आणि परमार्थ, अंतरंग आणि बाह्यरंग, लौकिक आणि अलौकिक याना एकत्र गुंफून मानवी जीवनाला आणि समाजाला सुंदरतेकडे नेणारे विचार संतांनी दिले. आपण करीत असलेले प्रत्येक कार्य मनापासून केले तर त्या कार्यातच परमेश्वर भेटू शकतो हे सावता महाराजांनी दाखवून दिले. संत साहित्यात केवळ अध्यात्म, परमार्थ आणि निवृत्तीचाच विचार नाही त्यात प्रवृत्तीचा विचार आहे. सुनिताराजे पवार यांनी आभार मानले. दीपक करंदीकर यांनी सूत्रसंचालन केले.