top of page

मसाप ब्लॉग  

लोकमान्यांनी स्वकर्तृत्त्वातून टिळक युग निर्माण केले : डॉ. सदानंद मोरे

महाराष्ट्र साहित्य परिषदेत स्मृतिशताब्दीनिमित्त अभिवादन

फोटोओळ : लोकमान्य टिळकांच्या स्मृतीशताब्दी वर्षाच्या पुर्वसंध्येला महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे टिळक युग या विषयावर डॉ. सदानंद मोरे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ’केसरी’चे विश्ववस्त-संपादक डॉ. दीपक टिळक, यांनी साहित्य परिषदेच्या पदाधिकार्‍यांना लोकमान्यांचा पुतळा भेट दिला. प्रा. मिंलिद जोशी यांनी तो स्विकारला.

पुणे : देशपातळीवरचे पहिले नेतृत्त्व म्हणून देशाने लोकमान्यांना स्विकारले. त्यांनी स्वातंत्र्य ही सामान्यांची चळवळ केली. त्यातून स्वातंत्र्याची ज्योत पेटली. स्वातंत्र्याच्या चळवळीतील इतर नेते राजमान्य होते. मात्र टिळक लोकमान्य होते. टिळक फक्त राजकीय पुढारी नव्हते, तर लोकांचे सुख दुःख समजून घेणारे नेते होते. त्यामुळे ते लोकांना आपले वाटले. त्यातून टिळक युग निर्माण झाले. देशाच्या स्वातंत्र्य चळवळीतील युगप्रवर्तक नेते म्हणजे लोकमान्य अशा शब्दांत साहित्य संस्कृती महामंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी लोकमान्यांचा गौरव केला.

लोकमान्य टिळकांच्या स्मृती शताब्दी वर्षाच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्र साहित्य परिषदेत टिळक युग या विषयावर डॉ. मोरे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ’केसरी’चे विश्ववस्त-संपादक डॉ. दीपक टिळक, साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिंलिद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्षा सुनीताराजे पवार, कार्यवाह दीपक करंदीकर यांच्यासह सभागृहात विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

डॉ. मोरे म्हणाले, 'टिळक कोणाचे शिष्य नव्हते. त्यांना कोणी गॉडफादरही नव्हता. त्यांना कोणी घडविले नाही त्यांच्या मागे कोणाचाही वरदहस्त नव्हता. ते स्वतः घडले. म्हणून टिळक युग आहे. स्वातंत्र्य लढ्याचे देशपातळीवरचे पहिले नेतृत्व टिळकांनी केली. म्हणून ब्रिटिश टिळकांना घाबरत होते. टिळक खर्‍या अर्थाने लोकांचे नेते होते. गांधीजींनी बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षण हे लोकमान्यांचे विचार पुढे नेले. टिळकांनी जो मार्ग अवलंबला होता. तोच मार्ग एका अर्थाने गांधीजींनी पुढे स्विकारला होता. केसरी आणि मराठा वृत्तपत्रे सुरू झाली. त्यातून लोकमान्यांनी जे विचार मांडले. ते देशहिताचे होते. स्वातंत्र्य लढ्याच्या मध्यभागी महाराष्ट्राला ठेवण्यासाठी टिळकांनी त्याग केला.'

प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, 'समाज आणि देशहिताची पत्रकारिता लोकमान्यांनी केली. त्यांचे विचार समाजाला नवी दृष्टी देणारे होते. म्हणूनच आजच्या तरूणाईत टिळक विचारांचे आकर्षण आहे. त्यांना मातृभाषेविषयी आस्था होती. त्यांनी भाषेविषयीही आग्रलेख लिहिले. कोसळणार्‍या आभाळाला सावरणारा नरकेसरी असेच लोकमान्यांचे वर्णण करावे लागेल.'

डॉ. दीपक टिळक म्हणाले, 'लोकमान्यांच्या प्रत्येक विचारामागे देश आणि लोकहित होते. बहिष्कार, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षणाचा संपूर्ण आराखडा त्यांच्याकडे तयार होता. त्यांनी नुसते देशाचे नव्हे, तर मानवाचे स्वातंत्र्य मागितले होते. जन्मत: जे जे मिळायला हवे ते मागितले होते. त्यामुळे त्यांच्या विचारात लोकशाहीचे बीज होते. काळ बदलला तरी लोकमान्यांचे विचार कालातीत वाटतात.'

दीपक करंदीकर यांनी सुत्रसंचालन केले. सुनीताराजे पवार यांनी आभार मानले.Featured Posts
Recent Posts
Archive
Search By Tags
No tags yet.
Follow Us
  • Facebook Basic Square
  • Twitter Basic Square
  • YouTube Social  Icon
bottom of page