राज्यकर्ते कलावंतात सवतासुभा निर्माण करतात : डॉ. प्रकाश खांडगे

महाराष्ट्र साहित्य परिषदेत अण्णाभाऊ साठेंना परिसंवादातून अभिवादन
पुणे : अण्णा भाऊ साठे आणि त्यांचे सर्व समकालीन लोक कलावन्त यांच्यात सुसंवाद आणि समन्वय होता. समाजहितासाठी सर्वजण एकत्र यायचे हे चित्र आज दिसत नाही. त्यामुळे या दुहीचा फायदा घेत राज्यकर्ते कलावंतात सवतासुभा निर्माण करतात. अशी टीका लोककलांचे अभ्यासक डॉ. प्रकाश खांडगे यांनी केली. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, संवाद पुणे आणि स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित परिसंवादात ते बोलत होते. 'लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी महाराष्ट्रासाठी दिलेले योगदान' या परिसंवादात प्रा. मिलिंद जोशी यांनी डॉ. बजरंग कोरडे, डॉ माधवी खरात, डॉ प्रकाश खांडगे, वि. दा. पिंगळे यांच्याशी संवाद साधला. प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार, कार्यवाह उद्धव कानडे यावेळी उपस्थित होते.
डॉ. खांडगे म्हणाले, 'अण्णाभाऊनी तमाशासाठी लोकनाट्य हा शब्द दिला. त्यांनी गणात शूरवीर, महापुरुष आणि मातृभूमीला वंदन करायला सुरुवात केली. त्यांनी लोककला समाज प्रबोधनासाठी वापरल्या. त्यांनी मराठी साहित्याला नवीन प्रतिमा दिल्या.
डॉ. बजरंग कोरडे म्हणाले, 'अण्णाभाऊना साहित्य लेखनाची प्रेरणा साम्यवादी चळवळीतून मिळाली असे सांगितले जाते, पण त्यांना साम्यवादाच्या मर्यादा माहिती होत्या त्यामुळे इथली परिवर्तनवादी विचारधारा देखील त्यांच्या साहित्य लेखनाची प्रेरणा होती. त्यांच्या साहित्याचे मूल्यमापन करणारी समीक्षेची परिमाणे नसल्याने त्यांच्या साहित्यिक योगदानाकडे महाराष्ट्राचे दुर्लक्ष झाले.'
डॉ. माधवी खरात म्हणाल्या, 'अण्णाभाऊंच्या साहित्याने प्रस्थापित साहित्य व्यवहाराला धक्का दिला. चेहरा नसलेल्या माणसांना त्यांनी साहित्याच्या केंद्रस्थानी आणले त्याकाळातील समीक्षकांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. पण आजही त्यांच्या साहित्यावर संशोधन करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना फारसे प्रोत्साहन दिले जात नाही. हे जास्त खेद जनक आहे.'
पिंगळे म्हणाले, 'अण्णाभाऊंचे साहित्य विद्रोही असले तरी विखारी नव्हते. त्यांचे स्वप्न मानव मुक्तीचे होते. त्यांनी व्यवस्था बदलण्यासाठी लेखन आणि चळवळी केल्या.'